News Flash

शिवसेना वाढेल या भीतीने केंद्रात एकच मंत्रिपद, रामदास कदम यांचा आरोप

भाजपा पाठीत खंजीर खुपसून सेनेला संपवण्याचे काम करत आहे

ramdas kadam
पर्यावरण मंत्री रामदास कदम (संग्रहित छायाचित्र)

शिवसेना वाढेल, या भीतीने केंद्रात १९ खासदार असतानाही सेनेला एकच मंत्रिपद देण्यात आले. भाजपा शिवसेनेचे बोट पकडून राज्यात मोठी झाली. आज तीच भाजपा पाठीत खंजीर खुपसून सेनेला संपवण्याचे काम करत आहे, असा आरोप पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचार असल्याची टीकाही त्यांनी केली. नोटबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा मोदींवर प्रचंड रोष असल्याचे सांगत, भाजप नेहमीच शिवसेनेला संपवण्याचे षडयंत्र रचत आला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी युती तोडण्याचा निर्णय योग्य असल्याचेही ते म्हणाले.

सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना कदम यांनी भाजपावर टीका केली. ज्या वेगाने भाजपा मोठी झाली त्याच्या दुप्पट वेगाने ती खाली येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना होती म्हणून लोकांनी भाजपाच्या उमेदवारांना जिंकून दिले. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचा एकही खासदार निवडून येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना ते म्हणाले, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांच्या आशा वाढल्या होत्या. पाकिस्तानला चांगला धडा शिकवतील असे वाटले होते. मात्र मोदी हे लाहोरमध्ये जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचे केक कापत राहिले आणि दुसरीकडे पाकिस्तानी सैनिक सीमेवर भारतीय सैनिकांच्या माना कापत राहिले. मोदी यांना याची शरम वाटायला हवी होती. नोटबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा मोदींवर प्रचंड रोष आहे.

युतीमध्ये शिवसैनिकांनी भाजपाचा उमेदवार निवडून यावा, याकरिता जिवाचे रान केले. मात्र त्याचवेळी भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचा उमेदवार कसा पडेल, यासाठीच प्रयत्न केले, हा विश्वासघातच असल्याचे त्यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2018 7:48 am

Web Title: shiv sena leader ramdas kadam criticized on bjp and pm narendra modi
टॅग : Ramdas Kadam
Next Stories
1 सरकार जाहिरातींमध्ये मग्न ! उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र
2 पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा
3 धोरणावरचा विश्वास उडाल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ
Just Now!
X