News Flash

खाटा, प्राणवायूचा तुटवडा

चाचणी अहवाल विलंबामुळे पालघरमध्ये संसर्गाचा प्रसार

पालघर जिल्हा प्रशासनाने आदेश दिल्यानंतर नवीन करोना काळजी केंद्र तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार व्यवस्था उभारण्यात येत आहे.

चाचणी अहवाल विलंबामुळे पालघरमध्ये संसर्गाचा प्रसार

पालघर : पालघर जिल्ह्यात एकच प्रयागशाळा असून तिची एक हजार करोना चाचण्यांची क्षमता आहे. सध्या जिल्ह्यात दीड हजरांपेक्षा चाचण्या करण्यात येत असून उर्वरित चाचण्यांचे स्वॅब मुंबईत पाठविले जात आहेत. तेथून अहवाल येण्यास चार ते पाच दिवसांचा अवधी लागत आहे. त्यामुळे अहवाल येईपर्यंत रुग्ण इतरांच्या संपर्कात येत असल्याने जिल्ह्यात करोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.

त्यात चाचणी अहवाल आल्यानंतरही गृह विलगीकरणात असलेल्या बाधितांकडून निर्बंध पाळले जात नाहीत. जिल्हा प्रशासनाने नवीन करोना काळजी केंद्र तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न आहेत. प्राणवायू व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम आहे.

जिल्ह्यातील संशयित करोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी हाफकिन इन्स्टिटय़ूट, आयसीएमआरचे एनआयआरआर एच केंद्र तसेच जे.जे रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. जिल्ह्यातून दररोज १५०० नमुने पाठवण्याची मान्यता असली तरी निष्कर्ष अहवाल प्राप्त होण्यास चार ते पाच दिवसांचा अवधी लागत असल्याचे दिसून आले आहे. तपासणी केलेल्या रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के मारण्यास जिल्हा आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याने बाधित घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे कुटुंबीयांसह मित्र परिवारापर्यंत संसर्ग पसरवत असल्याने शहरात कराना रुग्णवाढ कायम आहे.

अत्यवस्थ रुग्णांना ग्रामीण भागात शासकीय यंत्रणा अपुरी असल्याने पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. येथील रुग्णखाटांची क्षमता २० आहे, ती दहाने वाढविण्यात आली आहे. डहाणू उपजिल्हा रुग्णालयात करोनासाठी १६ खाटा असून त्यामध्ये १८ खाटांची वाढ करण्यात आली आहे. याखेरीज वाणगाव ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांच्या सुविधा असून त्या ठिकाणी दहा खाटा वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पालघर तालुक्यात ढवळे रुग्णालय, चिन्मय रुग्णालय तसेच तुंगा या खासगी रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये बोईसर बेटेगाव येथील लाईफ लाईन रुग्णालय, पालघर येईल फिलीया रुग्णालय व रिलीफ हॉस्पिटल यांच्यासह बोईसर येथील वरद रुग्णालयांना करोना उपचर सुविधा वाढविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याचबरोबरीने विक्रमगड येथील शारदा हॉस्पिटलमध्ये देखील ४० खाटांचे करोना काळजी केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

अशा रुग्णालयांमध्ये आवश्यकता भासल्यास तसेच उपचार करण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ असल्यास अतिदक्षता खाटा पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासने दर्शविली आहे. असे असले तरी या खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करण्याच्या व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम आहे.

पालघर शहरातील आदिवासी विकास विभागांतर्गत असलेले मुलांचे व मुलींचे होस्टेल तसेच बोईसर कांबळगाव येथील आश्रमशाळा करोना काळजी केंद्रामध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या ठिकाणी निवडक खाटांना उच्चदाब प्राणवायू पुरवठा करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले.

खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण आवश्यक

जिल्हा प्रशासनाने पालघर तालुक्यातील रुग्णसंख्येची झपाटय़ाने होणारी वाढ पाहता खासगी रुग्णालये समर्पित करोना रुग्णालय पद्धतीने उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असले तरी अशा रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना महागडे उपचार घेणे शक्य होत नाही.

जिल्हा प्रशासनाकडे मनुष्यबळाच्या मर्यादा असल्याने अशा खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण करून सर्वसामान्य नागरिकांना उपचार देणेदेखील अशक्य झाले आहे.

शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी

करोनाचा पालघर तालुक्यात प्रसाराचा वेग पाहता जिल्ह्य़ाबाहेर राहणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर येऊ  नये असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्हा मुख्यालय, विविध विभाग प्रमुख, आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच आपत्कालीन विभाग पूर्णपणे कार्यरत ठेवण्यात आला होता.

वसईत ४९२ नवीन करोनाचे रुग्ण ; दोन जणांचा मृत्यू

वसईत सोमवारी ४९२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ३१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात सोमवारी ४९२ नवीन  करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ३०८ पुरुष व १८४ महिला यांचा समावेश आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३९ हजार ६७५ एवढी झाली आहे.  मृतांची संख्या ही ९३४ इतकी झाली आहे.  तर आज ३१४ रुग्ण करोनामुक्त होऊन परतले आहेत. करोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ७७३ वर गेली आहे. आतापर्यंत ५ हजार ९६८ रुग्ण उपचार घेत आहेत.

रायगड येथून प्राणवायू आणण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी महसूल विभागामार्फत प्रयत्न करत आहोत.

प्रवीण मुंदडा, साहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पालघर

प्राणवायूचा तुटवडा आहे. परंतु आम्ही सोमवारी १० टन प्राणवायूची व्यवस्था केली आहे. तो पुढील दोन दिवस पुरणार आहे. प्राणवायू मागवत आहोत.

गंगाथरन डी., आयुक्त, वसई विरार महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 12:18 am

Web Title: spread of coronavirus in palghar due to delay in test report zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वसई-विरार शहरांत दोन दिवसांचा साठा
2 शहरबात  : धोकादायक वैतरणा पुलाकडे रेल्वे व प्रशासनाचे दुर्लक्ष
3 चिमुकलीकडून वाढदिवसानिमित्त रक्तपेढीला ३६ बाटल्या रक्त
Just Now!
X