एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले. त्यानंतर कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काही वेळापूर्वी बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर हा संप मागे घेतल्याचे जाहीर केले. हा संप मागे घेतला गेल्याने राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान आज दिवसभर हा संप सुरु होता. या संपादरम्यान १९ शिवशाही बस फोडण्यात आल्या. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवशाही ही वातानुकुलित शिवशाही बस सुरु केली. त्याचमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी या बसेसना लक्ष्य केले. दोन दिवस चाललेल्या या संपामुळे एसटीचा १८ कोटींचा महसूल बुडाला आहे. दिवसभरात राज्यातील २५० एसटी आगारातून बसेसच्या फक्त २० टक्के फेऱ्याच झाल्या. तर ९७ आगारांतून एकही फेरी झाली नाही. राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांना या संपाचा सर्वाधिक फटका बसला. मराठवाडा आणि विदर्भात ४० टक्के वाहतूक सुरु होती. आता मात्र हा संप मागे घेण्यात आल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.