News Flash

वणीतील दोन विद्यार्थ्यांची ‘यूपीएससी’त भरारी

अभिनव इंगोले व सुमित रामटेके यांनी वाढवला यवतमाळचा गौरव

अभिनव इंगोले व सुमित रामटेके

एखादी गोष्ट सातत्य ठेवून जिद्द आणि चिकाटीने केली तर यश नक्कीच प्राप्त होते. याची प्रचिती काल जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वणी तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांच्या यशामुळे आली.  वणी येथील अभिनव प्रवीण इंगोले याने ‘यूपीएससी’च्या जाहीर झालेल्या निकालात देशातून ६२४ वी, तर याच तालुक्यातील शिरपूर येथील सुमित सुधाकर रामटेके याने ७४८ वी रँक मिळवून यवतमाळचा गौरव वाढवला.

अभिनवचे वडील शिक्षक असल्याने घरात सुरूवातीपासूनच शैक्षणिक वातावरण होते. अभिनवने बालपणापासूनच अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले होते. त्याचे प्राथमिक शिक्षण वणी येथील विवेकानंद विद्यालयातून झाले. तो इय्यता दहावीमध्ये गुणवत्ता यादीत झळकला होता. मराठी या विषयात महाराष्ट्रात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने त्याला ग.दि. माडगुळकर पुरस्कारही मिळालेला आहे. बारावीनंतर त्याने सांगली येथून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. मात्र प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हायची जिद्द मनात ठेवून त्याने युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. तब्बल सात वेळा अपयश मिळाल्यानंतर अखेर त्याने अपेक्षित यश प्राप्त केले. मुंबई येथे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया येथे नोकरी करीत असताना त्याच जोमाने त्याने परीक्षेची तयारी सुरू ठेवली. काल जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात ओबीसी प्रवर्गातून ६२४ वी रँक प्राप्त केली आहे. अभिनवची बहीण अंकिता ही आयुर्वेदामध्ये पीएचडी करीत आहे, तर वडील प्रवीण इंगोले हे सेवानिवृत्त शिक्षक आहे. आई प्राची इंगोले या गृहिणी आहेत.

शिरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
वणी तालुक्यातील शिरपूर सारख्या गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याऱ्या सुमित रामटेके याने दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त करून शिरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. सुमितच्या घरची परिस्थिती तशी हालाकीची. वडील सुधाकर हे शिरपूर येथील गुरुदेव विद्यालात परिचारक म्हणून कामाला होते. सुमितने शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. वणी येथील जनता विद्यालयात बारावी केल्या नंतर आयआयटी वाराणसी येथून बी. टेक ची पदवी प्राप्त केली. एका कंपणीत मोठ्या पगाराची नोकरी देखील मिळाली. मात्र सुमितला प्रशासकीय सेवेत जायचं होतं. त्यामुळे त्याने नागपूर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले. त्याची  भारत सरकारच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडन्ट पदी निवड झाली. मात्र तो रुजू झाला नाही. त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्धार केला व पुणे गाठले. रोज नियमित १० ते १२ तास अभ्यास केला. वाचनासोबतच प्रश्नपत्रिका सोडवण्यावर अधिक भर दिल्याचे सुमितने सांगितले. चिकाटीने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्याने दाखवून दिले. यूपीएससीच्या जाहीर झालेल्या निकालात सुमितने अनुसूचित जाती प्रवर्गातून ७४८ वी रँक प्राप्त केली. त्याच्या या यशात त्याची आई ज्योत्स्ना रामटेके यांचा मोठा वाटा आहे. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा प्राप्त करूनही त्यांनी गावात शिवणक्लास चालवून कुटुंबाला हातभार लावला. त्याने मिळविलेल्या या यशाने ग्रामीण भागातील मुलंसुद्धा यशाचे शिखर गाठू शकतात हे अभिनव व सुमितच्या यशाने सिद्ध झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 2:32 pm

Web Title: success of two students from wani in upsc examination msr 87
Next Stories
1 चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या चिमणीवर बसून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन
2 #DhanyawadBalasaheb हॅशटॅग होतोय ट्रेण्ड; अमेरिकेतील सेलिब्रेशनच्या पोस्टरवरही झळकले बाळासाहेब
3 रायगड : जिल्ह्यात पावसाचा जोर अद्यापही कायम; महाडमध्ये पूरस्थिती
Just Now!
X