दिगंबर शिंदे

पंचक्रोशीमध्ये कुंडलची जशी कुस्ती प्रसिद्ध आहे तशीच येथील जिलेबीही प्रसिद्ध आहे. दिसायला वेडीवाकडी असली तरी परिसरात कुंडलच्या जिलेबीची चव चाखली नाही असा माणूस जसा आढळत नाही, तसाच स्वातंत्र्यसंग्रामातील तुफानी सेनेशी नाते नाही असे घर या पाच हजार लोकवस्तीच्या गावात आढळत नाही. घरटी किमान एका तरी व्यक्तीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफानी सेनेत प्रत्यक्ष सहभाग घेतलेला होता. अशा स्वातंत्र्य चळवळीचा धगधगता वारसा असलेल्या क्रांती अग्रणी जी. डी. बापूंच्या घराण्यातील अरुणअण्णा लाड यांच्या रूपाने आमदारकी मिळाली आहे. गेल्या वेळी बंडखोरी करणाऱ्या लाड यांना शेवटी राष्ट्रवादीचीच आमदारकी मिळाली.

गेल्याच आठवडय़ात पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. कुंडलच्या लाड यांनी या निवडणुकीमध्ये एकाच मतदारसंघात असलेल्या, पण तालुक्याच्या सीमेमुळे शेजारी वसलेल्या कडेगावच्या संग्राम देशमुख या भाजपच्या उमेदवाराचा पराभव करीत असताना महाविकास आघाडीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांना राजकीय शह दिला आहे. या मतदारसंघावर गेली २० वर्षे भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. राज्यात झालेल्या सत्ताबदलाचा पुरेपूर फायदा लाड यांनी उठवला. यामागे अर्थातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मोर्चेबांधणी जशी आहे, तशी काँग्रेस, शिवसेना आघाडीतील घटक पक्षाचेही योगदान मोलाचे ठरले.

अभ्यासू व्यक्तिमत्त्व

लाड हे मितभाषी, अभ्यासू, दूरगामी परिणामांचा विचार करून निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. डॉ. पतंगराव कदम यांच्या हयातीमध्ये हा मतदारसंघ आपल्या वाटय़ाला कधीच येणार नाही याची जाणीव ठेवून त्यांनी २०१२ पासूनच पदवीधर मतदारसंघासाठी मोचेबांधणी सुरू केली होती. मदतीला राष्ट्रवादी सोबत राहीलच असा आडाखा होता. मात्र २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये पूर्ण तयारी करूनही पक्षाने उमेदवारी दिली नाही. पक्षाने सारंग पाटील यांना उमेदवारी दिल्याने बंडखोरी केली. त्या वेळी भाजपेतर मतांची विभागणी झाल्यामुळे चंद्रकांतदादांचा विजय सुकर झाला. त्या वेळी विजयी झालेल्या चंद्रकांतदादांना ५१ हजार ७११ प्रथम पसंतीची मते मिळाली होती, तर लाड यांना ३२ हजार ८७६ आणि सारंग पाटील यांना ४४ हजार ७७० मते मिळाली होती.

ही चूक या वेळी टाळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. पक्षात बंडखोरी तर टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीमंत कोकाटे यांनी अखेपर्यंत आपली उमेदवारी कायम ठेवली. मात्र लाड यांनी गेल्या निवडणुकीमध्ये केलेल्या श्रमाचे, कष्टाचे या वेळी सोने झाले असेच म्हणावे लागेल. पाच जिल्हय़ांत गेल्या वेळी साधलेला संपर्क कायम ठेवत संवाद कायम ठेवला. याचाच फायदा या वेळी झाला. या लढय़ात खरी साथ मिळाली ती चिरंजीव जिल्हा  परिषदेचे सदस्य शरद लाड यांचे. त्यांनीही पडद्याआड राहून यंत्रणा कार्यरत राहील, कुठेही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेत सतर्कता राखली. याचेच फलित म्हणजे विक्रमी मते लाड यांना मिळाली.

लाड यांना क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार चळवळीचा अनुभवही पाठीशी आहे. या कारखान्याच्या परिसरातील सुमारे १० हजार एकर क्षेत्राला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सहकारी पाणीपुरवठा संस्था, बालवाडीपासून पदवीपर्यंत शिक्षण देणारी गांधी एज्युकेशन सोसायटी, दूध संघ या माध्यमातून सामाजिक काम उभे करण्यात आले आहे. केवळ शिक्षणाची सोय न करता ग्रामीण भागातील मुलांनाही स्पर्धा परीक्षामध्ये संधी मिळावी यासाठी उत्तम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अत्याधुनिक सोयीसुविधांची अभ्यासिका ही तर कामे लक्षणीय आहेतच, पण त्याचबरोबर पुढच्या पिढीसाठी आवश्यक असलेला पर्यावरण संवर्धनाचा वारसाही जपला आहे. प्रत्येकाने मोकळ्या जागी वृक्ष लागवड करावी असा आग्रह धरत असताना लावलेले झाड तीन वर्षे जतन करून निसर्गाच्या हवाली करेपर्यंत त्याची काळजी घेण्याची गरज ओळखून त्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्यवाही होते की नाही याची नित्य पडताळणी करणे हे अरुणअण्णांचे मोलाचे काम म्हटले पाहिजे.

संग्राम देशमुख यांची यासाठी तयारीही फारशी नव्हती. मात्र मराठा समाजातील उमेदवार आघाडीकडून येणार हे गृहीत धरून ऐन वेळी देशमुखांच्या गळ्यात भाजप उमेदवारीची झूल माळण्यात आली.पाच जिल्हय़ांचा मतदारसंघ भाजपच्या जुन्या  कार्यकर्त्यांच्या जिवावर मैदान मारले जाईल असा असलेला होरा या निवडणुकीत चुकला हे मात्र मान्यच करावे लागेल.

आपला विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचा आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच शेतीचे प्रश्न सोडविणे, शेतकऱ्याला मूलभूत भेडसावणारे बियाणे, खते यांचा वाजवी दरात आणि वेळेत पुरवठा करण्याबरोबरच सहकारी पाणीपुरवठा संस्थांची अवास्तव वीज दर आकारणी कमी करणे या प्रश्नाला प्राधान्य राहील.

– अरुण लाड, विजयी उमेदवार