मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असून, सरकारविरोधात प्रचंडा नाराजीचे वातावरण दिसत आहे. विरोधी पक्ष या मुद्यावरून आक्रमक झाले असुन, केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, शिवसेनेने तर राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा अशा शब्दांत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“सामना, संजय राऊत आणि अर्थशास्त्राचा जसा काडीचाही संबंध नाही तसा पेट्रोलच्या दराचा आणि रामवर्गणीचाही संबंध नाही. पेट्रोल दरवाढीवर बोलण्याआधी राज्य सरकारने आकारलेला २६ टक्के व्हॅट तर कमी करा.” असं भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.

तसेच, “सामनाकार बोरुबहाद्दर संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही. संबंध असल्याच तर टक्केवारीशी आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीवरून त्यांना राम मंदिराचा चंदा आठवला, काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्की लागला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात २६ रुपये व्हॅट राज्य सरकारचा आहे तो कमी करा. ममता बॅनर्जींचं एवढं तरी ऐका आणि मग मोदींवर टीका करा. मोदी जो टॅक्स गोळा करत आहेत त्यातील ४१ टक्के तुम्हाला मिळतो आहे. त्यामुळे लोकांना विनाकारण भरकटवायचं आणि खोटं बोलायचे उद्योग आता बोरुबहाद्दर संजय राऊत यांनी बंद करावे.” असं भातखळकर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

“राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”

“लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. केंद्रातील सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असेल तर जनतेने हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत!,” असा इशाराच शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून दिलेला आहे.