राज्यात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, दुसरीकडे रायगडकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.  दोन दिवसांत जिल्ह्यात एकही करोनाचा नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात आत्तापर्यंत करोनाचे ३२ रुग्ण आढळून आले आहेत. यात पनवेल महानगर पालिका हद्दीतील २६ तर पनवेल ग्रामीण आणि उरण येथील ६ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ३६४ जणांची करोना तपासणी करण्यात आली. यातील ३२१ जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले. तर ३२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. ११ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. चार जण करोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना बाधितांवर मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान  जिल्ह्यात दोन दिवसात करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ही एक दिलासादायक बाब आहे. पनवेल आणि उरण तालुके सोडले तर, २२ दिवसात जिल्ह्यातील 13 तालुक्यात एकही करोनाबाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील करोना प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे.