तरुण उद्योजकाला राज्य सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाची प्रतीक्षा
नगर : करोना रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूचा (ऑक्सिजन) सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. प्राणवायूचा औद्योगिक किंवा व्यापारी वापर बंद करून पूर्णत: वैद्यकीय वापर सुरू करण्यात आला आहे. तरीही मागणी प्रचंड वाढल्याने वैद्यकीय प्राणवायूची कमतरता जाणवतच आहे. त्यातून रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अशा आणिबाणीच्या परिस्थितीत नगर जिल्ह्यातील एक युवा उद्योजक सामाजिक भावनेतून करोना रुग्णांसाठी प्राणवायूची निर्मिती करू इच्छितो. मात्र, लालफितीचा कारभार त्याला मदतीचा हात द्यायला तयार नाही. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे संपर्क करूनही युवा उद्योजकाला टोलवाटोलवीचा अनुभव मिळतो आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवश्यक परवाने मिळवूनही या उद्योजकाला वैद्यकीय प्राणवायूच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा कच्चामाल— ‘लिक्विड ऑक्सिजन’चा पुरवठा करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. त्यासाठी त्यांनी प्रशासनातील अनेक विभागांकडे संपर्क केला, मात्र त्यांना कोणाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील भूषण मुनोत या तरुण उद्योजकाचा हा उद्वेगजनक अनुभव आहे.
भूषण मुनोत हे काष्टी येथीलच रहिवासी आहेत. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काहीकाळ प्राणवायूच्या पुरवठय़ाचा व्यवसाय केला. नंतर ‘मुनोत इंडस्ट्रियल गॅसेस’ ही कंपनी काष्टी गावातच सुरू केली. औद्योगिक उत्पादनासाठी लागणाऱ्या प्राणवायूची निर्मिती ते करतात. परंतु करोनारुग्णांना प्राणवायूचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने दि. १ एप्रिलपासून औद्योगिक वापर बंद ठेवण्याचा आदेश काढला. त्यामुळे त्यांची कंपनीही गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे.
करोनारुग्ण वाढीच्या प्रमाणात नगर जिल्हा देशात दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय प्राणवायूची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे आपला बंद कारखाना पुन्हा सुरू करून तेथे केवळ करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी कारखान्यात लागणारे आवश्यक तांत्रिक बदल त्यांनी केले. नवीन प्रयोगशाळा उभारली. दोन फार्मासिस्ट नेमले. अन्न व औषध विभागाकडून वैद्यकीय प्राणवायू निर्मितीचा परवानाही मिळवला.
त्यांना आता फक्त कच्चा माल म्हणून ‘लिक्विड ऑक्सिजन’ची गरज आहे, परंतु तो त्यांना मिळत नाही. तो मिळाल्यास प्रतितास ६० सिलेंडर प्राणवायूचे उत्पादन ते आपल्या कारखान्यात करू शकतात. नगर, बारामती, पुणे येथे ‘लिक्विड ऑक्सिजन’चा पुरवठा होत आहे. परंतु ग्रामीण भागातील श्रीगोंद्याच्या मुनोत यांच्या मागणीची कुणीही दखल घेत नाही.
‘लिक्विड ऑक्सिजन’चा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स, लिंडे, पऱ्याकझर अशा बडय़ा कंपन्या चाकण परिसरात आहेत. त्या राज्यभर ‘लिक्विड ऑक्सिजन‘चा पुरवठा करतात. परंतु त्यांच्याकडे मागणी करूनही मुनोत यांना तो मिळत नाही. ‘लिक्विड ऑक्सिजन‘च्या पुरवठय़ावर राज्य सरकारचे नियंत्रण असल्यामुळे त्यांची परवानगी आवश्यक असल्याचे या बडय़ा कंपन्या सांगतात. त्यानुसार मुनोत यांनी अन्न व औषध विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधला, मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. किमान श्रीगोंदा तालुक्यातील करोनारुग्णांना तरी वैद्यकीय प्राणवायू पुरवण्यासाठी ‘लिक्विड ऑक्सिजन’ द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु त्यासाठीही त्यांना कच्चामाल मिळत नाही.
..तर जिल्ह्यातील दुसरा कारखाना सुरू होईल
प्राणवायू निर्मितीचा केवळ एक कारखाना नगर जिल्ह्यात, नेवासे तालुक्यात आहे. इतर केवळ पुरवठादार आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास दुसरा, भूषण मुनोत यांचा कारखाना नगर जिल्ह्यात सुरू होऊ शकेल व काही अंशी तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे.