जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

जिल्ह्यत तूर खरेदीच्या एकूण प्रकरणात संपूर्ण चौकशी करून दोषी विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जे शेतकरी तूर खरेदीच्या निकषात बसतात, त्यांनी घोषणापत्र दिल्यानंतरही ज्यांची तूर खरेदी झाली नाही, ती खरेदी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खासदार राजीव सातव यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळाला दिले.

जिल्ह्यात तूर खरेदीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शुक्रवारी खासदर राजीव सातव यांनी काही शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन तूर खरेदीत झालेल्या गरप्रकाराची व तूर खरेदीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा केली. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत नाहीत, त्यांनी घोषणापत्र दाखल केले नाही. अशा शेतकऱ्यांची तूर खरेदी केली गेली, मात्र घोषणापत्र देऊनही अनेक शेतकरी तूर खरेदीपासून वंचित आहेत. त्या शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा, अशी भूमिका खासदार सातव यांनी जिल्हा प्रशासनासमोर मांडली.

शासनाने घालून दिलेल्या नियमांतर्गत ज्या शेतकऱ्यांनी घोषणापत्र दाखल केले त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत तुरीची तपासणी करून पंचनामे केले. तपासणी अहवाल महसूल यंत्रणेमार्फत प्राप्त झाला असून त्यांच्या यादीत जे शेतकरी पात्र ठरतात व जे खरेदीपासून वंचित आहेत त्यांची तूर खरेदी केली जाईल. सकाळीच तूर खरेदीच्या प्रश्नावर जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सचिवासोबत चर्चा करून सविस्तर माहिती मागविली असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी प्रत्यक्ष तूर खरेदीच्या निमित्ताने प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी तुरीची तपासणी केली. असलेल्या मालाबद्दल पंचनामे करून घेतले.

परंतु काही शेतकऱ्यांच्या घरी तूर उपलब्ध नव्हती. त्यांच्याकडून तूर विक्री केल्याचे सांगण्यात आले. परंतु अशा काही शेतकऱ्यांची नावे बाजार समितीच्या नोंदवहीत नाहीत. त्यामुळे यादीत नाव नसलेल्या व ज्यांची तूर खरेदी झाली या प्रकरणात जिल्हाधिकारी चौकशी करून संबंधीताविरूध्द कारवाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी तूर खरेदीच्या निमित्ताने बेलुरा येथील शेतकरी दीपक गंगाधर गुठ्ठे यांनी आपली कैफियत मांडतांना सांगितले, की त्याच्या नावावर २५ क्विंटल ५० किलो, संदिप गुट्टे यांच्या नावावर २५ क्विंटल तसेच त्रेवेणीबाई गुठ्ठे यांच्या नावाने १० क्विंटल तूर बाजार समितीत मोजून घेण्यात आली. यांची नावे यादीत आहेत. त्यांनी आपले घोषणापत्र सुध्दा दिले. परंतु तूर मोजून घेतल्यानंतरही त्या शेतकऱ्याला पावती दिली नसल्याची तक्रार त्याने खासदार सातव यांच्यासमोर मांडली. याप्रमाणेच अनेक शेतकरी तूर खरेदीपासून वंचित आहेत. सोयाबीन पिकाचे पंचनामे करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.