लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या दोन माजी आमदारांनी हातात ‘घड्याळ’ बांधत राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील माजी आमदार हरिदास भदे व बळीराम सिरस्कार यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित बुधवारी पक्षप्रवेश केला.

भारिप-बमसंचे दोन वेळा आमदार राहिलेले हरिदास भदे व बळीराम सिरस्कार यांनी आपल्या समर्थकांसह काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती. हरिदास भदे यांनी अकोला पूर्व मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले. त्यानंतर सलग दोनवेळा त्यांचा पराभव झाला. बळीराम सिरस्कार यांनी अकोला जि.प.चे अध्यक्षपद भूषवले असून, बाळापूर मतदारसंघातून दोन वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये तिकीट देण्यात आले होते. त्याठिकाणी पराभव झाल्यानंतर बाळपूरमधून त्यांच्या जागी डॉ.धैर्यवर्धन पुंडकरांना उमेदवारी देण्यात आली. हरिदास भदे धनगर, तर बळीराम सिरस्कार माळी समाजाचे नेते आहेत.

वंचित आघाडीमध्ये विश्वासात घेतले जात नसल्याने दोन्ही माजी आमदार नाराज होते. त्यामुळे ते वंचितमधून बाहेर पडले. तेव्हापासून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या बैठकीही झाल्या होत्या. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते रामेश्वर पवळ यांनी मध्यस्थी केली होती. करोनामुळे प्रवेश रखडला असतांना आज अचानक मुंबई येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खा. सुनील तटकरे, राहुल डोंगरे आदी उपस्थित होते.