प्रसेनजीत इंगळे

वसई सोनकेळीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु अलीकडे नालासोपारा शहरात रासायनिक पद्धतीने प्रक्रिया करून काही केळी पिकवली जात असल्याचे उघड झाले आहे. केळी पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

नालासोपारा शहरात भेसळयुक्त दूध, पनीर, मिठाई बनविण्याचे कारखाने असल्याचे नुकतेच उघडकीस आले होते. आता त्यात केळ्यांची भर पडली आहे. शहरात अनेक ठिकाणी रासायनिक प्रक्रिया करून केळी पिकवली जात आहेत. वसई-विरारमध्ये ७० हून अधिक केळ्याच्या वखारी आहेत. रासायानिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या केळ्यांची गुणवत्ता आणि दर्जा घसरला आहे. कमालीच्या अस्वच्छतेत ही केळी कृत्रिमरीत्या पिकवली जात आहेत. ही केळी पिकवण्यासाठी इथेलीन नावाचा गॅस वापरला जात आहे. हा गॅस वापरण्याचे एक प्रमाण अन्न व औषध प्रशासनाने ठरवून दिले आहे. पण जलद गतीने केळी पिकवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात या गॅसचा वापर सर्रास केला जात आहे. साधारणत:  या गॅसचा वापर करून केळी पिकण्यासाठी ६ ते ७ दिवस लागतात. पण जास्त प्रमाणात वापर केल्याने केळी केवळ एक ते दोन दिवसांतच तयार केली जातात. लवकर केळी तयार करण्यासाठी या ठिकाणी या घातक गॅसचा वापर केला जात आहे. अशाप्रकारे पिकवलेली केळी वसई, विरार, नायगाव, भाईंदर आणि मुंबईतही विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. या वखारींची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे असतानाही अजून एकदाही स्थानिक प्रशासन अथवा अन्न व औषध प्रशासन विभागाने पाहणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

पिकविण्याची पद्धत

एका वखारीत १०० ते १५० पेटय़ा एका शीतपेटीत ठेवल्या जातात. त्यावर इथेलीनची फवारणी केली जाते. शीतगृहात १३ ते १५ अंश तापमानाखाली तीन ते चार दिवस बंद करून ठेवले जाते. साधारण १ ते २ टन फळांसाठी केवळ ७ ते ८ ग्रॅम इथेलीनचा वापर केला जाऊ शकतो. हे प्रमाण वाढविल्यास त्याचा आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यात कर्करोगाची शक्यता असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

इथेलीनचा योग्य प्रमाणात वापर केल्यास कोणताही धोका नाही. पण अधिक प्रमाणात वापर झाल्यास ती फळे आरोग्यास धोकादायक ठरू शकतात.

-राहुल शिरसाड, कृषी अधिकारी वसई

रसायनांद्वारे केळी पिकवली जात असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत, या संदर्भात पाहणी सुरू आहे. असा प्रकार आढळल्यास  कारवाई करू.

-प्रकाश वाघमारे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, ठाणे</p>