नवीन आदेशानुसार अनेक बाबतीत शिथिलता देण्यात आली असली तरी कांदा, बटाटा वगळता वर्धेकरांना काही काळ जिल्ह्यातीलच भाजीपाल्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

शासनाच्या नवीन आदेशानुसार ३० जूनपर्यत टाळेबंदी आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सुधारीत नियमावली जाहीर करतांना जिल्ह्याबाहेरून भाजीपाला, फळे, चिकन, मटण व मासे यांच्या वाहतुकीस मनाई केली आहे. मात्र कांदा, बटाटा, आलं, लसूण यांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात भाजीपाल्याचे पुरेसे उत्पादन होत असल्याची आकडेवारी प्रशासनाने लक्षात ठेवून करोनाला प्रतिबंध घालतांना ही मनाई केली. बाहेर जिल्ह्यातून कांदा, बटाटा आणणाऱ्या वाहनांना शहराबाहेरील वाहनतळावर सर्व प्रकारची तपासणी करणे आवश्यक आहे.

करोनाबाधित रूग्ण सापडलेल्या क्षेत्रात बाह्यरूग्ण विभाग आणि दवाखाने सुरू करण्यास मनाई आहे. तीस व्यक्तींच्या उपस्थितीत विवाहास परवानगी देतांनाच पाच व्यक्तींच्या बँड पथकास मुभा मिळाली. दुकानातील प्रत्येक ग्राहकात एक मिटरचे अंतर, थुंकण्यास मनाई, दुकाने व शासकीय कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक करण्यात आले आहे.

रात्री ९ ते सकाळी ५ या कालावधीत वैद्यकीय सेवेशिवाय बाहेर फिरण्यास प्रतिबंध आहे. कर्मचारी व ग्राहक यांना हात धुण्याची स्वतंत्र व्यवस्था अनिवार्य आहे. प्रती बस पन्नास टक्के प्रवासी क्षमतेने जिल्ह्यांतर्गत सार्वजनिक बस व्यवस्था सुरू राहणार आहे. मधल्या काळात सुरू झालेल्या केश कर्तनालयावर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद ठेवतांनाच ऑनलाईन दूरस्थ पध्दतीने अभ्यासक्रम चालू ठेवण्यास मुभा मिळाली आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हे निर्देश देतांनाच यापूर्वी परवानगी मिळालेल्या विविध उद्योगांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे स्पष्ट केले.