मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला गुरूवारी लातूरमध्ये अपघात झाला. या अपघातातून मुख्यमंत्री आणि त्यांचे तीन सहकारी सुखरुप बचावले. प्रथमदर्शनी हा अपघात किरकोळ वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या अपघातानंतर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओजवरून त्याची स्पष्ट कल्पना येते.

[jwplayer 9ANBlSc0]

निलंग्यात जेथे हा अपघात झाला त्याठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था नव्हती. त्यामुळे शाळेच्या एका मैदानात हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी तात्पुरती सोय करण्यात आली होती. यावेळी हेलिकॉप्टरने यशस्वीपणे टेकऑफ केले. मात्र, हेलिकॉप्टर जमिनीपासून तब्बल ८० फुटांवर असताना विमानाच्या मागच्या बाजूस असलेल्या पंख्यात बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर खाली येऊ लागले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेलिकॉप्टरचा पंखा खाली असलेल्या विजेच्या खांबाला धडकला. अपघाताच्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचा पंखा विजेच्या तारेला लागला तेव्हा मोठा स्पार्क झाल्याचेही स्पष्टपणे दिसते आहे. याशिवाय, हेलिकॉप्टर कोसळले त्या ठिकाणापासून विजेचा ट्रॉन्सफॉर्मर अवघ्या १०० मीटर अंतरावर होता. त्यामुळे हेलिकॉप्टरचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने हेलिकॉप्टरच्या पंख्याने विजेची तार तुटल्यानंतर येथील वीजपुरवठा खंडीत झाला आणि पुढील अनर्थ टळला. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हेलिकॉप्टर मातीच्या ढिगाऱ्यावर कोसळल्याने आतील व्यक्तींना फारशी दुखापत झाली आहे. हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते वैमानिकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अपघात होण्यापासून टळला. वैमानिकाने हेलिकॉप्टरचे नियंत्रण गमावल्यानंतरही आपले सर्व कौशल्य पणाला लावल्यामुळेच हेलिकॉप्टर सुरक्षित स्थळी उतरवण्यात यश आले, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.