10 April 2020

News Flash

आमची निवडणूक : टिपरी-पाणीचा खेळ झाला आहे..

मूळ प्रश्नाला बगल देऊन आपण भलतेच मुद्दे लोकांच्या माथी मारत आहोत

अतुल पेठे

 

* निवडणुकीत मुख्य मुद्दे कोणते?

माझ्या दृष्टीने लोकशाहीमध्ये निवडणूक होणे आणि वैध मार्गाने उमेदवार निवडून येणे ही गोष्ट आवश्यक आणि महत्त्वाची आहे, पण तो उमेदवार कोणत्या मुद्दय़ांवर निवडून येतो हे बघणे जास्त महत्त्वाचे आहे. आपला समाज विविध जाती-पाती, धर्म आणि आर्थिक स्तर यांनी युक्त असा आहे. याचे र्सवकष भान त्या उमेदवाराला तसेच त्याच्या पक्षाला आहे की नाही हे पाहणे माझ्या दृष्टीने आवश्यक असते. लोकसभेची निवडणूक ही जशी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची मी मानतो तशी विधानसभेची निवडणूक ही राज्य पातळीवर केंद्रित झालेली असते. त्यामुळे राज्यापुढचे महत्त्वाचे प्रश्न कोणते याचा मी शोध घेतो. माझ्या दृष्टीने शिक्षण, रस्ते, आरोग्य, बेकारी, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि अशांतता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. भावना भडकावणाऱ्या अस्मितांपेक्षा मला जगण्याचे प्रश्न सुकर करणे गरजेचे वाटते.

* या मुद्दय़ांना राजकीय पक्ष भिडतात असे वाटते का?

मुळीच नाही असे माझे स्पष्ट मत आहे. मूळ प्रश्नाला बगल देऊन आपण भलतेच मुद्दे लोकांच्या माथी मारत आहोत. कानठळ्या बसतील अशा भाषणांनी बहिरे करणे आणि वाटेल ते दाखवून आंधळे करण्याचे काम होर्डिग आणि जाहिरातींच्या माध्यमातून होत आहे. ही निवडणूक त्याला अपवाद ठरणारी नाही. काही मूल्ये घेऊन माणसे आणि पक्ष लढतो की नाही, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. काल काँग्रेसमध्ये असलेला आज भाजपमध्ये आहे आणि भाजपचे तिकीट मिळाले नाही म्हणून तिसऱ्या पक्षात.. हा स्वत:च्या फायद्यावर लक्ष ठेवून टिपरीपाणीचा खेळलेला खेळ वाटतो.

* नव मतदारांना काय संदेश द्याल?

नव्याने मतदान करू इच्छिणाऱ्यांनी आपल्या उमेदवाराला आणि त्याच्या पक्षाला निर्भीडपणे प्रश्न विचारले पाहिजेत. आपल्या जगण्यातील गाभ्याचे प्रश्न कोणते आहेत, याचा त्यांनी विचार करून त्याची उत्तरे राजकीय पटलावर शोधली पाहिजेत.

* प्रचारात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत असे वाटते?

पूर्वीपासून निवडणुकीत पैशाचा खेळ किंवा अपव्यय याचे प्रत्यंतर सगळ्यांनाच येत आहे. मूल्यरहित राजकारण्यांची भावना भडकाविणारी भाषणे, शहराला विद्रूप करणाऱ्या गोष्टी, खोटी वचने, फसवे जाहीरनामे, दिशाभूल करणारी वक्तव्ये तसेच प्रत्यक्ष आणि छुप्या पद्धतीने होणारा आर्थिक गैरव्यवहार टाळला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.

संकलन : विद्याधर कुलकर्णी

अतुल पेठे, नाटय़ दिग्दर्शक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2019 12:52 am

Web Title: atul pethe on key points in the election abn 97
Next Stories
1 आघाडीत टीकेलाही नेते उरले नाहीत – ठाकरे
2 काँग्रेसचे नेते भुरटे चोर, भाजपचे डाकू -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
3 आमच्याकडे होता तेव्हा ‘राम’, भाजपात गेल्यावर झाला ‘रावण’
Just Now!
X