भाजपाने आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व १०५ आमदारांसह सहकारी पक्षांचे आमदार व समर्थन दिलेल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली व काय ठरवण्यात आले यासंदर्भात भाजपा नेते आशिष शेलार यांनी बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली.

शेलार यांनी सांगितले की, आज भाजपाच्या सहकारी पक्षाच्या व समर्थन देणाऱ्या सर्व पक्षांच्या आमदारांची एकत्र बैठक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेतली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी यात मार्गदर्शन घेतलं. राज्यात सत्तास्थापनेचं जे तीन अंकी नाटक सुरू आहे, त्यावर भाजपा लक्ष ठेवून आहे. आज बैठकीत हा निर्णय घेतला आहे की, राज्यभरात भाजपाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. भाजपाचे सर्व आमदार येणाऱ्या महिनाभराच्या काळात राज्यभरातील ९० हजार बुथवर भाजपा मजबूत करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम राबवणार आहेत. याचबरोबर उद्यापासून ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून शहरी भागातील आमदार विधानपरिषद सदस्य देखील सलग दोन ते तीन दिवस अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, मदत, पीक विमा कर्ज परतफेड या सर्व विषयांसाठी मदत कार्याची पाहणी आणि मदत करायला दौरा करणार आहेत. असा कार्यक्रम आजच्या बैठकीत ठरलेला आहे.

राज्यातील सरकार स्थापने दिशेनं शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसनं आज एक पाऊल टाकलं आहे. समान कार्यक्रम ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांची आज मुंबईत बैठक पार पडली. यानंतर भाजपाच्या हालचालींना देखील वेग आल्याचे दिसत आहे.