राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अंतिम टप्प्यात आलेला आहे. भाजपा – शिवसेना आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. तर, शिवसेनेकडून मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार असे ठामपणे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
आठवले यांनी म्हटले आहे की, पाच आणि सहा तारखेला मी दिल्लीत होतो. पाच तारखेला मी गडकरींशी चर्चा केली. जेव्हा आम्ही बैठकीत होतो तेव्हा भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी देखील बोलणं झालं. त्यावेळी नितीन गडकरी समोर मी प्रस्ताव ठेवला होता की, गडकरी आणि शिवसेनेचे संबंध चांगले आहेत. सध्या हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसली आहे, भाजपा मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. अशावेळी हा तिढा सोडवण्यासाठी तुमची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्ही मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. यावर त्यांनी सांगितले की, मी सुभाष देसाई यांच्या संपर्कात आहे. आम्ही अनेक वर्षांपासून सोबत आहोत, एवढ्याशा कारणावरून आम्ही वेगळं होणं योग्य नाही ठरणार. आमचे प्रयत्न सुरू आहेत.
दोन्ही पक्ष वेगळे झाले तर दोघांचेही नुकसान आहे. कारण बहुमतासाठी लागणारा आकडा भाजपा किंवा शिवसेनेकडे देखील नाही. दोन्ही पक्ष एकत्र आले तरच बहुमताचा आकडा गाठला जाऊ शकतो. यामुळेच मला वाटतं की दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं, गडकरींनी मी यासाठी प्रयत्न करेन असं म्हटल्याचंही आठवले यांनी सांगितलं आहे.
भाजपा शिवसेना युतीला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे सरकार महायुतीचंच येणार हे उघड आहे. शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर १०५ जागा जिंकल्याने मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असाही विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असंही गडकरींनी स्पष्ट केलं. यावेळी गडकरींना तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता अशी चर्चा रंगली आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की मी केंद्रात काम करतो आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.