महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली आहे. आज सकाळपासूनच आजच राष्ट्रपती लागू होईल अशी चर्चा सुरु होती. यासंदर्भातली शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली. मात्र शिवसेना दावा सिद्ध करु शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतर चोवीस तासांची मुदत देण्यात आली मात्र त्याच्या आतच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
President’s Rule imposed in the state of #Maharashtra, after the approval of President Ram Nath Kovind. pic.twitter.com/tR3qW4xYbR
— ANI (@ANI) November 12, 2019
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. महायुतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु होता. या दोन्ही पक्षांचं आपसात काहीही ठरलं नाही. त्यामुळे शिवसेनेने भाजपापासून काहीही कल्पना न देता फारकत घेतली. त्यानंतर राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. १०५ जागा जिंकलेल्या भाजपाने शिवसेनेने महायुती म्हणून निवडणूक लढवूनही सोबत येण्यास नकार दिल्याने त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यास शुभेच्छा असं म्हणत असमर्थता दर्शवली.
१०५ जागा जिंकणाऱ्या भाजपाने जेव्हा सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं आणि २४ तासांची मुदत दावा सिद्ध करण्यासाठी दिली. मात्र शिवसेना हा दावा मुदतीत पूर्ण करु शकली नाही त्यामुळे त्यांचा दावा अर्थहीन ठरला. शिवसेना दावा सिद्ध करु न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली मुदत पूर्ण होण्याआधीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
याआधी आज दिवसभर अनेक घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही संपर्कात होते. तसंच काँग्रेसचे नेतेही दिल्लीहून शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. अशा सगळ्या घडामोडी घडत असताना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कॅबिनेटची बैठकही झाली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या सत्ता पेचावर चर्चा झाली आणि त्यानंतर अवघ्या दोन तासात या प्रस्तावावर सही करण्यात आली. ज्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.