कोल्हापूर जिल्ह्यात कामं करुनही कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या बंडखोर प्रवृत्तीमुळे आम्हाला इथे पराभवाचा सामना करावा लागला, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या पराभवाचे विश्लेषण करताना मंडलिकांवर शरसंधान साधले. कोल्हापूरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपा-शिवसेनेला राज्यभरात विविध निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले. आमच्या सरकारने सर्वत्र चांगली कामेही केली मात्र, तरीही अनेक ठिकाणी आमचा पराभव झाला त्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत आहोत याचं आत्मचिंतनही आम्ही करतो आहोत. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आम्ही जनतेला विचारु इच्छितो की, आम्ही प्रामाणिकपणे काम केलं मग आमचं चुकलं कुठं हे जनतेनं आम्हाला सांगावं. याबाबत जर पत्रकार आणि सामान्य नागरिकांकडून आम्हाला कळलं तर आम्ही त्यावर काम करु.

कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संजय मंडलिक यांनी भाजपावर आरोप केले होते तसेच इतर पक्षातील लोकांना मदत करण्याचे संकेतही दिले होते तिथूनच पहिल्यांदा पराभवाची ठिणगी पडली असे सांगताना पाटील यांनी बंडखोरी करणाऱ्या मंडलिकांवर सडकून टीका केली. मंडलिकांनी याला पाड त्याला पाड या आपल्या मूळ संस्काराप्रमाणे राजकारण केलं. ते आपल्या सोयीचं राजकारण करीत आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मूळ शिवसैनिकांनी या मंडलिक प्रवृत्तीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

उदयनराजेंचा पराभव आमच्या जिव्हारी लागलाय – पाटील

उदयनराजेंचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असून त्याचं विश्लेषणही आम्ही करत आहोत. उदयनराजेंचा पराभव झाला असला तरी यापूर्वी भाजपाकडून जशी अनेकांची काळजी घेतली गेली तशीच उदयनराजेंचीही काळजी घेतली जाईल, त्यांना योग्य तो मान दिला जाईल, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.