निकाल लागताच मदत करणाऱ्या आघाडीला पाठ

खास प्रतिनिधी, अमरावती</strong>

युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा घेऊन रिंगणात उतरलेल्या  राणांची ही कोलांटउडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. त्या देखील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या  पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. पण जिंकल्यानंतर लगेच नवनीत राणा आणि रवि राणा यांनी भाजपच्या सत्तावर्तुळात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांची छायाचित्रे प्रसिद्धीला पाठवली होती. त्यावेळी नवनीत राणा या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता रवि राणांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.

राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि इतर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. सोबतच गेली पाच वर्षे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला व जनतेला न्याय मिळवून दिला. अमरावती जिल्ह्यासह बडनेरा मतदार संघाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, याकरिता आपण पाठिंबा देत आहोत, असे पत्र रवि राणा यांनी दिले आहे.

बडनेरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना रवि राणा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा मिळवला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक इच्छुकांना डावलून रवि राणांना पाठिंबा देण्याचे वरिष्ठ पातळीवरील राजकारण अनेक स्थानिक नेत्यांना पसंत पडले नाही. तरी, काही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रचारादरम्यान रवि राणा यांच्यासोबत होते. अनेकांनी मात्र त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले होते. दुसरीकडे, भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी गर्दी होती. शिवसेनेने मात्र बडनेराची जागा मागितली. शिवसेनेच्या प्रीती बंड यांच्यासोबत रवि राणा यांची चुरशीची लढत झाली, त्यात प्रीती बंड यांना पराभव पत्करावा लागला. रवि राणा यांनी प्रचारादरम्यान, मुख्यमंत्र्यांची सभा बडनेरा मतदारसंघात आयोजित करून दाखवावी, असे आव्हान भाजप-सेनेच्या स्थानिक नेत्यांना दिले होते. मुख्यमंत्री आपल्या विरोधात अवाक्षरही काढणार नाहीत, असा दावा देखील त्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांची सभा बडनेरा मतदारसंघात झाली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी अमरावतीतील भाषणात रवि राणांचा उल्लेखही केला नाही, त्यामुळे रवि राणा यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला होता.

मतदारांच्या भावनेचा आदर व्हावा

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असली, तरी बडनेरा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या कोटय़ात आहे. या मतदारसंघातील प्रश्न त्यांनी हाताळायला हवेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रवि राणा यांच्यावर नियंत्रण ठेवायला हवे. रवि राणा यांनी ज्या मतांच्या आधारावर आपण निवडून आलो, त्या मतांचा आदर आणि भान ठेवणे हे गरजेचे आहे.

– किशोर बोरकर, शहर अध्यक्ष, काँग्रेस.