प्रशांत देशमुख, लोकसत्ता
वर्धा : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान आणि फ्रान्सच्या ‘गांधी इंटरनॅशनल’च्या वतीने सेवाग्राम आश्रम परिसरात आयोजित ‘गांधी व त्यापुढे’ या विषयावरील परिसंवादासाठी येणाऱ्या जवळपास निम्म्या परदेशी पाहुण्यांना वेळेत व्हिसाच मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आले नसल्याने व्हिसा घोळाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
सेवाग्राम आश्रम परिसरात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ‘गांधी व त्यापुढे’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यात देश-विदेशातील वक्ते सहभागी होणार होते. या कार्यक्रमासाठी एकूण ६० प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. यापैकी २२ जण परदेशांतून येणार होते. मात्र, २२ पैकी १२ प्रतिनिधीच उपस्थित राहू शकले. उर्वरितांना वेळेवर व्हिसाच मिळाला नाही. या १२ प्रतिनिधींनी भारतात येण्यासाठी विमानाची तिकिटे काढली होती. व्हिसासाठी ते ताटकळत थांबले होते. शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला. मात्र, तोवर तिकिटे रद्द करण्यात आली होती. एक- दीड लाख रुपये मोजून पुन्हा तिकिटे काढणे शक्य नसल्याने या प्रतिनिधींनी येण्याचा बेतच रद्द केला.
उद्घाटन सत्रात फ्रान्सचे लुईस कॅपाना आणि क्रिस्टोफ ग्रेग्ररी, अॅटलास विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर आणि आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशाबेन बोथरा यांचीच हजेरी होती. दुपारच्या सत्रात केरळचे के. पी. शंकरन, प्रा. जोसुकुट्टी, अमेरिकेचे प्रा. मायकल सोनलिटनेर, फ्रान्सचे ग्रेग्ररी यांची भाषणे झाली. मात्र, काँगो, येमेन आणि अन्य देशांतील प्रतिनिधी पोहोचू शकले नाही. व्हिसा वेळेवर न मिळण्याची कारणे काय असावी, याबाबत आता तर्कविर्तक लढविण्यात येत आहेत.
‘कारणांबाबत अनभिज्ञ’
व्हिसा मिळण्यास विलंब झाला, असे आश्रम प्रतिष्ठानचे सचिव प्रदीप खेलूरकर यांनी सांगितले. व्हिसा वेळेत न मिळण्याची कारणे कळू शकली नाहीत, असे परिसंवादाचे संयोजक डॉ. सीबे जोसेफ यांनी नमूद केले. मात्र, परिसंवादात पोहोचू न शकणारे प्रतिनिधी कोण आणि ते कोणत्या देशांचे होते, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यातील काही जण आज, बुधवारी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.