पुणे-बंगळूरू महामार्गावर कराडजवळील उड्डाणपुलाचे काम वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. इथे नियोजित भव्य उड्डाणपूल हा देशात कमी प्रमाणात साकारला गेला आहे. कराडजवळील या एकखांबी पुलाची रुंदी २९.५ मीटर आहे. त्याचे खाली व वर चार अधिक चार असे आठ आणि एकूण १४ पदर असल्यामुळे कराड ते मलकापूर अशा सततच्या वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याचे मोठे नियोजन आहे.
हेही वाचा- हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार, शैलेश टिळक यांची घेतली भेट
भंडारा जिल्ह्यात साखोली आणि लाखनी येथे यापूर्वी अशा प्रकारचा पूल उभारण्यात आलेले आहेत. शेंद्र ते कागल सहापदरीकरणाचे अनेक वर्षापासून रखडलेले काम आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत प्रत्यक्षात गतीने सुरु होत आहे. केंद्र सरकारने या एकूण कामासाठी ४ हजार ४८९ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या कामाचा शुभारंभ झाला होता. आता, हे काम प्रत्यक्ष सुरु होत आहे. या कामाचा मुख्य ठेका आदानी उद्योग समूहाकडे असून, सहठेकेदार म्हणून डी. पी. जैन कंपनी काम करणार आहे. सध्या डी. पी. जैन कंपनीचे मुख्याधिकारी प्रदीपकुमार जैन हे येथे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल आहेत. दरम्यान, कराड व लगत असलेल्या मलकापूर शहरांच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही उड्डाणपूल पाडण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल केल्याची अधिसूचना पोलीस अधीक्षकांनी नुकतीच जारी केल्याने आता कोणत्याही क्षणी हे उड्डाणपूल जमीनदोस्त करण्याचे प्रत्यक्ष काम सुरु होईल. त्यासाठीची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. ठेकेदार कंपनीचे अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचारी तसेच प्रशासनासह पोलिसांची कुमक राहणार आहे. उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी भल्यामोठ्या आठ यंत्रांचा वापर करून हे पाडकाम ४५ दिवसात पूर्ण होण्याचा अंदाज आहे. याकामी चार जॉक्रशर (जबडा क्रशर कॉम्प्रेशनद्वारे मोठे खडक किंवा धातू कमी करणारे. क्रशरच्या दोन जबड्यांचा वापर करून यांत्रिक दाब लावणारे आधुनिक यंत्र) तसेच चार बकेट क्रशर वापरले जाणार आहेत.
हेही वाचा- “विधानपरिषदेच्या निवडणुकीतील राजकारण बाळासाहेब थोरातांच्या सहमतीनेच”; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
जॉक्रशर क्रशरने पुलाचा निसटलेला भाग जागीच क्रश (बारीक तुकडे करणे) होणार आहे. यात ब्रेकर वापरले जाणार नसल्याने प्रचंड धूळ फैलावणे टळणार आहे. क्रशरच्या वापरामुळे पुलाचा पाडकाम होणारा भाग मशीनमध्ये जावून क्रश (बारीक तुकडे) होऊन खाली येईल. हे होत असताना धूळ उडू नये म्हणून पाण्याचे फवारणी यंत्र (जॅक) वापरले जाईल. आणि परिसरातील लोकांना व वाहनधारकांना धुळीची समस्या राहणार नाही. तर, धूळ नसल्याने पाडकाम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गतीने काम करणे शक्य होणार आहे. ज्यावेळी पुलाचा भाग तुटून खाली पडेल तो थेट बकेट क्रेशरने (बादलीच्या आकाराचे कांडण यंत्र) बारीक करून उपयोगात आणला जाईल. एक विशेष म्हणजे जेव्हा हा पूर्ण पूल पाडला जाईल त्यावेळेला जी सामग्री उरेल ती टाकावू होणार नसून, हे सर्व साहित्य बांधकामात उपयोगात आणले जाणार आहे. त्यातील लोखंड (स्टील) कापून त्याची विक्री होईल. कामामध्ये जी सॉयल (बांधकामाचा चुरा/भुकटी) उच्चप्रतीचे असेल ते पुन्हा वापरात आणले जाणार आहे. तसेच हे एकूणच काम कमीतकमी कालावधीत व्हावे म्हणून रात्रंदिवस यंत्रणा राबवली जाईल.
हेही वाचा- जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचं बक्षीस; भाजपा पदाधिकाऱ्याची वादग्रस्त घोषणा
५० ते ६० डंपर वापरले जातील. इथे जो उड्डाणपूल नव्याने बनवणार आहे. तो अद्वितीय (युनिक) असणार आहे. हे काम अत्यंत उत्कृष्ट करून हा पूल २० ते २२ महिन्यात पूर्ण करण्याचा सहकंत्राटदारांचा प्रयत्न राहणार आहे. या एकूणच कामात सध्याच्या रस्त्याकडेची १० हजार ८८० झाडे तोडावी लागतील आणि त्याऐवजी नवीन ५५ हजार झाडे ठेकेदार लावून देणार आहे. या दोन वैशिष्ट्यपूर्ण उड्डाणपूलासह १३३ किलोमीटरच्या सातारा ते कागल अशा सहापदरीकरणातील ६७ किलोमीटर लांबीचा सुसज्ज रस्ता ठेकेदार व सहठेकेदार कंपनीने सुमारे २३ महिन्यात पूर्ण करण्याचा विश्वास दिला आहे