छत्रपती संभाजीनगर : वळवाच्या पावसामुळे मराठवाड्यात आतापर्यंत २७ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ३९२ जनावरे दगावली आहेत. मराठवाड्यात वीज पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने वीज अटकाव करणारी यंत्रे वाढवावीत, अशा सूचना मान्सूनपूर्व बैठकीत करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात ५०३ वीज अटकाव यंत्रे आहेत. त्यातील सर्वाधिक ३०८ एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. आतापर्यंत मृत व्यक्तींची संख्याही बीडमध्येच सर्वाधिक आहे.
अन्य सात जिल्ह्यांत १९५ वीज यंत्रे आहेत.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सोमवारी घेतलेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ७५, जालना व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी चार एवढीच वीज अटकाव यंत्रे आहेत.यातील परभणी जिल्ह्यातील सर्व यंत्रे नादुरुस्त अवस्थेत असल्याची माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून मराठवाड्यात पावसामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून, मे महिन्यात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. एका वीज अटकाव यंत्राची किंमत पाच हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. जर वीज पडून मृत्यू कमी करायचे असतील, तर ही यंत्रे वाढवावी लागतील, अशी मागणी केली जात आहे. याशिवाय ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ हे दोन ‘ॲप’ मोबाइलमध्ये घेतल्यास वीज पडू शकते की नाही, याचा अंदाज मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील १४ प्रमुख नद्यांवर आठ जिल्ह्यांतील ६५५ गावे पूरप्रवण असल्याने या गावांत कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.केवळ माॅन्सूनपूर्व आढावाच नाही, तर राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीमध्येही मराठवाड्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचा आढावा घेतला जात आहे. कोणतीही मालमत्ता तारण न घेता पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. पतमानांकन तपासू नये, अशा तोंडी सूचनांबरोबरच त्या बँकांना लेखी स्वरूपात द्याव्यात, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील प्रलंबित नुकसानभरपाई कंपन्यांनी द्यावी, तसेच रसायनिक खत वितरणातील दोष दूर करण्यासाठी राज्य सरकारने आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
खतपुरवठ्यात सुरळीतपणा हवा
बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा या तालुक्यांतील खत वितरणासाठी अहिल्यानगरहून आरक्षित साठा मिळावा. हा साठा अन्य कोणी तरी उचलतो. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव या तालुक्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हा थांबा आहे. मात्र, तेथून खते उपलब्ध होत नाहीत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यासाठी जालना येथून खतसाठा आरक्षित करण्याची गरज आहे. हे होत नसल्याने वाहतूक खर्च वाढतो, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. प्रकाश देशमुख यांनी व्यक्त केले.