पुणे – बंगळुरू महामार्गावर कराडलगतच्या मलकापूर शहर हद्दीतील ढेबेवाडी फाटा येथे हवाला पद्धतीने मुबंईहून दक्षिण भारतात मोटारगाडीने नेली जात असलेली पाच कोटींची रक्कम सशस्त्र टोळीने लुटली. मंगळवारी (दि. १५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा धाडसी दरोडा टाकला गेला असतानाही सायंकाळी उशिरापर्यंत याची फिर्याद कराड शहर पोलिसात दाखल झाली नव्हती.

महामार्गावर तब्बल पाच कोटींची लूट होवूनही सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात फिर्याद दाखल नसल्याने या प्रकरणासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लुटारुंची ही सशस्त्र टोळी पाच- सहा जणांची असून, या प्रकरणात चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असून, आरोपींचा माग घेण्यासाठी पोलीस पथकेही कार्यरत झाली आहेत.

हेही वाचा >>> पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले

मुंबईतून हवाल्याने पैसे पोहोचवणाऱ्या कंपनीचा कारभार दक्षिण भारतात मोठ्या शहरात आहे. दक्षिण भारतात त्या कंपनीची मोटारगाडी पाच कोटींची रक्कम पोहोच करण्यासाठी निघाली होती. ही मोटारगाडी सोमवारी रात्री मुंबईहून दक्षिण भारताकडे रवाना झाली आणि ती मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कराडलगतच्या मलकापूर शहरातील ढेबेवाडी फाटा येथे आली असता सशस्त्र दरोडेखोरांनी आपले वाहन आडवे मारून पाच कोटींची मोठी रक्कम नेणारी मोटारगाडी अडवली. पाच ते सहा सशस्त्र इसम त्यांच्या वाहनातून उतरले. त्यांच्याकडे असलेल्या पिस्तूलीसह धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी पाच कोटींची रक्कम लुटली. ती रक्कम घेवून ते मुंबईच्या दिशेने पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चौघांना ताब्यातही घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. यातील मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. उद्यापर्यंत लुटली गेलेली रक्कम व आरोपी अटक होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज, मातोश्रीवर परतले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्गावर झालेल्या मोठ्या लुटीमुळे सातारा जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर दिवसभर कराडमध्ये तपासकामी कार्यरत आहेत. कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राम ताशीलदार यांच्यासह डीबी, एलसीबीच्या व पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने तपास गतिमान केला. या लुटीच्या प्रकरणात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.