अलिबाग :  रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ५० च्या आसपास असलेले सक्रिय रुग्णांची संख्या ८३ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

जानेवारी महिन्यात आलेली करोनाची लाट फेब्रुवारी महिन्यात ओसरण्यास सुरवात झाली होती. मार्च महिन्यानंतर रुग्णवाढीचा दर शुन्य टक्यावर आला होता. त्यामुळे निर्बंध उठविण्यात आले होते. नागरीकांनाही दिलासा मिळाला होता. हळुहळू जनजीवन पूर्वपदावर आले होते. त्यामुळे करोनाविषयक नियमांच्या पालनाचा विसर पडल्याचे चित्र दिसत होते.

गेले दोन महिने जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या स्थिर होती. साधारणपणे सक्रिय रुग्णांची सख्या ५० च्या आसपास होते. आता मात्र यात पुन्हा वाढ होण्यास सुरवात झाली आहे. पनवेल, उरण, मुरुड माणगाव या तालुक्यात करोना पुन्हा बळावत असल्याचे दिसून येत आहे.  पनवेल मनपा हद्दीत करोनाचे ४२ रुग्ण आहेत. त्याखालोखाल मुरुड येथे १२, उरण येथे ८, पनवेल ग्रामिण ५. माणगाव येथे ४, म्हसळा येथे ४, अलिबाग येथे ३, सुधागड २, खालापूर १, पेण १ अशा एकून जणांवर ८२ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

पुन्हा सुरु झालेली रुग्णवाढ ही चिंतेची बाब असली तरी उपचाराधीन रुग्णांपैकी एकाही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही. ही एक दिलासादायक बाब आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.   जिल्ह्यात आजवर २ लाख १५ हजार ४२३ जणांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी २ लाख १० हजार ६४३ जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. तर ४ हजार ६९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण ० टक्क्यावर आहे. तर करोनामुळे दगावणाऱ्यांचे प्रमाण २ टक्क्यावर स्थिर आहे.  

लसीकरण स्थिती

जिल्ह्यात पहिली  २२ लाख ०५ हजार २१० जणांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर २० लाख ८३ हजार ४३८ जणांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर ५८ हजार २३२ जणांनी तिसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यातील करोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्केपेक्षा अधिक आहे.