राहाता : शरद पवारांनी मराठा समाजाचे आजवर वाटोळे केले. त्यांनी सुचवलेला पन्नास टक्क्यांवरील आरक्षणाच्या मार्गाशी आमचा संबंध नाही. तो त्यांनीच कसा देता येईल याबद्दल स्पष्ट करावे, अशा शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. पवारांना आजवर जमले नाही म्हणून तर आम्ही तुमच्याकडे मागत आहोत, असे सांगत त्यांनी महायुतीला विचारणा केली आहे.

हेही वाचा >>>मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीत छगन भुजबळ लक्ष्य; नाशिकमध्ये फेरीच्या प्रारंभापासून भुजबळांविरोधात घोषणाबाजी

जरांगे यांच्या शांतता रॅलीचे सोमवारी रात्री उशिरा शिर्डीत आगमन झाले. आज मंगळवारी सकाळी नाशिकला जाण्यापूर्वी जरांगे यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी पवारांवर वरील टीका केली. पवार यांनी काल ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाची टक्केवारी वाढवणे हाच त्याला मार्ग असून त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्याची भूमिका जाहीर केली आहे. पवारांच्या या विधानाचा संदर्भ देत जरांगे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा >>> फडणवीस-भुजबळ यांचा दंगली घडविण्याचा डाव – मनोज जरांगे यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरांगे म्हणाले, की मराठा आरक्षणाचा हा प्रश्न अगोदरच्या सरकारांनी देखील भिजत ठेवला. महाविकास आघाडीतील पक्षांनी याबाबत काहीही केले नाही. विशेषत: पवारांनी देखील या प्रश्नावर काही न करता समाजाचे वाटोळे केले. परंतु हे पक्ष असे वागले म्हणून तर मराठा समाज महायुतीकडे आरक्षण मागतो आहे. पण तुम्हीही तसेच वागत आहात. साधे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असे म्हटले होते. पण आज ११ महिने झाले. तरी संपूर्ण गुन्हे मागे घेतलेले नाहीत. या वेळी जरांगे यांनी महायुतीतील मराठा नेते नारायण राणे, राधाकृष्ण विखे, प्रवीण दरेकर यांच्यावरही टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या जरांगे यांनी येथेही त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी आरक्षण द्यावे, मग आम्ही त्यांच्यावर टीका करणे बंद करू असे ते म्हणाले.