अहिल्यानगर: शहराच्या केडगाव उपनगरामधील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान सध्या केडगाव उपनगरात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना तिप्पट रकमेची देयके प्राप्त झाली आहेत. त्यामुळेही नागरिकांमध्ये असंतोष आहे.
महापालिकेचे माजी सभापती मनोज कोतकर यांच्यासह अजित कोतकर, सोन्याबापू घेबुंड, सुमीत लोंढे, विजय सुंबे, अण्णासाहेब शिंदे, ओंकार कोतकर, अक्षय वीरकर, विश्वास साळुंखे, बाळू कोतकर, संकेत वाघमारे, संकेत शिंदे, ऋषी गवळी, योगेश आंबेकर, शुभम गायकवाड, शुभम आंबेकर, शुभम लोंढे, शिवम अरुण, श्रीनाथ टकले, करण ठोंबरे, स्वराज भोसले, अनिकेत लोंढे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
या संदर्भात माहिती देताना माजी सभापती कोतकर यांनी सांगितले, की महिन्यापूर्वी महावितरणला निवेदन देऊन केडगाव उपनगरातील विजेचे प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. तीन जुलैला बैठक आयोजित करून पंधरा दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र महावितरणकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत.
केडगाव उपनगरमध्ये नवीन वसाहती मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. अनेक भागात विद्युत व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे अंधाराचा गैरफायदा घेत चोऱ्या वाढल्या आहेत. नवीन भागात विजेचे खांब उभारणे, रोहित्राच्या पेट्या बसवणे, झाडाच्या फांद्यांमध्ये वीजवाहक तारा अडकल्यामुळे अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महावितरणने पावसाळ्यापूर्वीचे देखभाल-दुरुस्तीची कामेही केलेली नाहीत. शहराच्या केडगाव उपनगरामधील विजेचे हे प्रश्न सोडवण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
येत्या आठ दिवसांत प्रश्न सोडवले न गेल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोतकर यांनी दिला.
स्मार्ट मीटरला विरोध
सध्या केडगाव उपनगरात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना तिप्पट रकमेची देयके प्राप्त झाली आहेत. त्यामुळेही नागरिकांमध्ये असंतोष आहे. जेथे जास्त आकारणी झाली ती कमी करून देण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्यावरही कार्यवाही न झाल्याने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम थांबवावे अशीही मागणी कोतकर यांनी केली.