अहिल्यानगर : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १२ नगराध्यक्षांसह एकूण २८९ नगरसेवकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षपद जनतेमधून निवडले जाणार असल्याने नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका म्हणजे ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीच्या ठरणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून या निवडणुका रखडल्या होत्या. या निवडणुकांसाठी जिल्ह्यात ४ लाख ५१ हजार २८७ मतदार आहेत.
जिल्ह्यात ‘ब’ वर्ग असलेल्या श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या तीन नगरपरिषदांसह ‘क’ वर्गच्या जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शिर्डी नगरपरिषदा तर नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आता या सर्वच निवडणुका जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
शिर्डी नगरपरिषदेची पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. या निवडणुकीसाठी एकूण ४ लाख ५१ हजार २८७ मतदार असून त्यासाठी ५०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी तर सहायक म्हणून तहसीलदार व संबंधित पालिकांचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती केली जाणार आहे.
येत्या १० नोव्हेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. निवडणूक आयोगाने आज, मंगळवारपासून संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू केली आहे. अकरा नगरपरिषदेमध्ये द्विसदस्य तर नगरपंचायतमध्ये एक सदस्य निवडला जाणार आहे. प्रभाग संख्या पुढीलप्रमाणे: श्रीरामपूर- १७, कोपरगाव- १५, संगमनेर- १५, जामखेड- १२, राहाता- १०, शेवगाव- १२, राहुरी- १२, श्रीगोंदा- १२, पाथर्डी- १०, देवळाली प्रवरा- १०, शिर्डी- १२ व नेवासा नगरपंचायत- १७.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण
शिर्डी- अनुसूचित जाती महिला, राहुरी- अनुसूचित जमाती, कोपरगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाथर्डी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, राहाता- नागरिकांचा मागास प्रवर्ग, संगमनेर- सर्वसाधारण महिला, जामखेड- सर्वसाधारण महिला, शेवगाव- सर्वसाधारण महिला, देवळाली प्रवरा- सर्वसाधारण व्यक्ती, श्रीगोंदा- सर्वसाधारण व्यक्ती, श्रीरामपूर- सर्वसाधारण व्यक्ती व नेवासा नगरपंचायत- सर्वसाधारण व्यक्ती.
मतदार संख्या
शिर्डी- ३३ हजार ६१३, राहुरी- ३३ हजार २६९, कोपरगाव- ६३ हजार ४५३, पाथर्डी- २३ हजार २४२, राहाता- १९ हजार ४६५, संगमनेर- ५७ हजार ७१४, जामखेड- ३३ हजार १६१, शेवगाव- ३५ हजार ४७९, देवळाली प्रवरा- २३ हजार ८६१, श्रीगोंदा- २८ हजार ३२६, श्रीरामपूर- ८० हजार ९९२ व नेवासा नगरपंचायत- १८ हजार ७१२
नगरसेवक संख्या
शिर्डी- २३, राहुरी- २४, कोपरगाव- ३०, पाथर्डी- २०, राहाता- २०, संगमनेर- ३०, जामखेड- २४, शेवगाव- २५, देवळाली प्रवरा- २१, श्रीगोंदा- २२, श्रीरामपूर- ३४ व नेवासा नगरपंचायत- १७.
