सातारा : विधानसभा निवडणुकीत कुठेही मतांची चोरी झालेली नाही. विरोधक गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांची आणि अडचणीची कोणतीही काळजी नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यातील दहिवडी येथे केली.

सातारा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माण तालुक्यातील कार्यकर्ते अनिल देसाई यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आज प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनोज पोळ, सुनील पाटील (कराड) व अनेक सहकारी यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, उदयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला. आमच्या महायुतीच्या जागा कमी निवडून आल्या. त्यानंतर आम्ही आमच्या कामात सुधारणा केली. जनताभिमुख कामे केली. लोकांचा विश्वास जिंकला. यामुळे विधानसभा निवडणुकीत आमच्या तीनही पक्षांना महायुतीला २३८ जागा मिळाल्या. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी महायुतीच्या आणि मतांच्या विषयावर समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचे काम सुरू केले. विरोधक रडीचा डाव खेळत आहेत.

विधानसभा निवडणुकीत कुठेही मतांची चोरी झालेली नाही. मात्र, सध्या पावसामुळे झालेले नुकसान, लोकांच्या अडीअडचणींचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत आणि ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी व आमचे सर्व सहकारी काम करत आहोत. परंतु, अशा प्रश्नांबाबत विरोधकांना काहीही नाही. यावेळी बाळासाहेब सोळसकर, अनिल देसाई आदींची भाषणे झाली.

मी बढाया मारणारा माणूस नाही आणि कोणाचीही उणी दुणी काढत नाही. राजकारणात काम करताना ध्येय आणि विचार घेऊन काम करावे लागते, असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता जयकुमार गोरे यांना लगावला.

माझ्या मतदारसंघात येऊन ते सांगताहेत की तुमचा आमदार काहीही काम करत नाही. त्यांना बदललं पाहिजे. परंतु माझं त्यांना सांगणं आहे, तुम्ही किती मताने निवडून येता ते इथल्या जनतेला माहीत आहे. परंतु, मी माझ्या मतदारसंघात प्रत्येक वेळी उच्चांकी मताधिक्याने निवडून येतो. यावेळी मी ६२ हजार मताने निवडून आलो आहे, असे मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे यांना नाव न घेता सांगितले.