राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या गटातील विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. अशातच अजित पवार गटही आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी आली आहे. यात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा समावेश आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्या गटात असलेल्या आमदारांविरुद्ध अजित पवार गटाकडून अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, आमदार राजेश टोपे, आमदार अनिल देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार मानसिंग नाईक, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार रवींद्र भुसारा आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे.




हेही वाचा : “एकनाथ शिंदे अन् राष्ट्रवादीतील नेत्यांना फक्त लोकसभेसाठी जवळ घेतलं, पण…”, रोहित पवारांची भाजपावर टीका
पण, आमदार नवाब मलिक, आमदार सुमन पाटील, आमदार अशोक पवार आणि आमदार चेतन तुपे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. नवाब मलिक आणि चेतन तुपे यांनी आपली भूमिका अद्यापही जाहीर केली नाही.
हेही वाचा :
दरम्यान, जुलै महिन्यात अजित पवारांसह ९ जणांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती. या ९ जणांना अपात्र करण्याची याचिका यापूर्वी दाखल करण्यात आली आहे. अशातच गुरूवारी जयंत पाटील यांनी विधानपरिषद आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे, अनिकेत तटकरे यांच्याविरोधात अपात्रता याचिका सादर केल्या आहेत. तर, जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात याचिका सादर केली आहे.
या याचिकांवर कार्यवाही सुरू असून पुढील आठवड्यात संबंधितांना बाजू मांडण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून नोटीसा पाठविल्या जाणार आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसंदर्भातील अपात्रता याचिकांवरील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,” अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली आहे.
हेही वाचा : “तू सही कर, नाहीतर…”, रोहित पवार यांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप
६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात पोहचला आहे. त्याबाबत ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार अजित पवार गटाच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे.