Ajit Pawar Poster as Chief Minister : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून शनिवारी (२३ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदानानंतर लगेच जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल असे सांगण्यात आले. यानंतर आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यादरम्यान पुण्यात अजित पवारांच्या विधानसभा विजयाचे पोस्टर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या पोस्टरवर अजित पवार यांचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते संतोष नांगरे यांनी हे पोस्टर लावले होते. मात्र काही वेळाने हे पोस्टर उतरवण्यात आले.

अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करत लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा नेमका दावेदार कोण? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (२३ नोव्हेंबर) रोजी होणार आहे. त्याआधीच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून आम्हीच बहुमताने विजयी होणार असा दावा केला जात आहे.यादरम्यान महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दल चर्चा होताना दिसत आहेत.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?

मुख्यमंत्रि‍पदाच्या दाव्यावरून सत्ताधारी महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू मांडली होती. ते म्हणाले की, “मतदारांनी मतदानातून शिंदे यांना आपली पसंती दर्शवली आहे. मला वाटतं की, पुढील मुख्यमंत्री होणं हा एकनाथ शिंदे यांचा हक्क आहे”.

विधानसभानिवडणूक प्रचारादरम्यान महायुतीचा चेहरा एकनाथ शिंदे होते, त्यामुळे ते मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार ठरतात, असे दावाही शिरसाट म्हणाले होते.

पण भाजपाने मात्र यापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकतात असे म्हटले आहे. “भाजपामधून जर कोणी मुख्यमंत्री होणार असेल, तर ते देवेंद्र फडणवीस असतील”, असे दरेकर म्हणाले.

या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले. निकाल काहीही लागले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल असे मिटकरी म्हणालेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून वेगळे होत अजित पवार जुलै २०२३ मध्ये महायुतीमध्ये सहभागी झाले. पण खूप वर्षांपासून अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या प्रतिक्षेत आहेत.

अजित पवारांना संधी मिळेल का?

अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये. अजित पवार त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीत चार वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. पण अजित पवार हे यंदा मुख्यमंत्री पदावर बसतील की नाही? हे महायुतीमध्ये त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील पूर्णतः यावर अवलंबून आहे. पुण्यात मुख्यमंत्री असा उल्लेख करत लावण्यात आलेले पोस्टर काढून टाकलं असलं तरी या पोस्टरमधून अजित पवार आणि त्यांच्या पक्षाची मुख्यमंत्री पदाची इच्छा दिसून येते.

हेही वाचा>> Sanjay Raut : हा संपूर्ण दलित समाजाचा अपमान; शिंदेंच्या सेनेचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

मविआमध्ये दावेदार कोण

विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून देखील विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा दावा केला जात आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत आहे. पक्षाचे नेते वेळोवेळी तशी विधाने करत आहेत. तर लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या जोरावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव देखील पुढे केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतांचा वाढलेला टक्का प्रभाव टाकणार?

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार विधानसभा निवडणुकीत ६६.०५ टक्के मतदान झाले आहे. २०१९ साली झालेल्या मतदानापेक्षा (६१.१ टक्के) हा आकडा जास्त आहे. यादरम्यान सर्व मुख्य एक्झिट पोल्सनी राज्यात महायुतीचा विजय होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे सर्वात प्रबळ दावेदार असणार आहेत. विशेष बाब म्हणजे, एक्झिट पोलनुसार विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीमधील शिवसेना (ठाकरे) पक्षाचेनेते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात पसंतीचे उमेदवार म्हणून उदयास आले आहेत.