अकोले : तालुक्यातील देवठाणमध्ये चार दिवसांत तीन बिबटे पकडण्यात आले. मात्र या परिसरात आणखी बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सर्व बिबटे पकडण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वीच देवठाणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका बालिकेसह महिलेचा मृत्यू झाला होता.

दरम्यान वनखात्याच्या निषेधार्थ देवठाणमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वनखात्याने बिबट्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. कविता गांगड या तीन वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घराच्या अंगणात खेळत असणाऱ्या या मुलीला बिबट्याने उचलून नेले. चार महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.

अनेक दिवसांपासून देवठाण परिसरात बिबट्यांचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे बालिकेच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांमध्ये वनखात्याविरोधात मोठा रोष निर्माण झाला. रास्ता रोको आंदोलन करून लोकांनी आपला संताप व्यक्त केला. पकडलेले बिबटे जवळपासच सोडले जातात. त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.

बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करावी, एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर पिंजरे लावण्यापेक्षा ज्या परिसरात बिबट्यांचा वावर आहे तेथे कायमस्वरूपी पिंजरे लावावेत, प्रत्येक ग्रामपंचायतींना पिंजरे द्यावेत, तालुका बिबटेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आदी मागण्या करण्यात आल्या.

नरभक्षक बिबटे वनविभागाकडून जेरबंद होणार नसतील तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करू आस इशारा यावेळी देण्यात आला.
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. देवठाण परिसरात १२ पिंजरे लावण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी दोन बिबटे पिंजऱ्यात अडकले. त्यात एक मादी व एक पिल्लू आहे.

आज अजून एक बिबट्या पकडण्यात आला. त्यामुळे पकडलेल्या बिबट्यांची संख्या ३ झाली आहे. अजूनही या परिसरात तीन-चार बिबटे असावेत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सात दिवसांत सर्व बिबटे पकडून गाव बिबटमुक्त झाले नाही तर यापेक्षा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.