अलिबाग – फोटो व्‍हायरल करण्‍याची धमकी देत अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्‍याचार केल्‍याची संतापजनक घटना अलिबाग शहर परीसरात समोर आली आहे. धक्‍कादायक म्‍हणजे गेली दीड वर्षे या मुलीवर अत्‍याचार सुरू होता. याप्रकरणी अलिबाग पोलीसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

पिडीत अल्‍पवयीन मुलीचा तिच्‍या मित्रासोबतचा फोटो या आरोपी तरूणाच्‍या हाती लागला. हा फोटो तिच्‍या कुटुंबियांना दाखवण्‍याची आणि व्‍हायरल करण्‍याची धमकी देत या तरूणाने तिला ब्‍लॅकमेल करण्‍यास सुरूवात केली. हा फोटो तुझ्या कुटुंबियांना दाखवतो, व्‍हायरल करतो असे तो तिला धमकावत असे. या तरूणाने पिडीत मुलीला आपल्‍या घरी बोलावले. आणि तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केले. हा प्रकार गेली दीड वर्षे सुरू होता.

जाच असह्य झाल्‍याने अखेर या मुलीने अलिबाग पोलीस ठाणे गाठले आणि आपल्‍यावरील अत्‍याचाराची तक्रार दिली. तिच्‍या तक्रारीवरून आरोपी तरूण दीर्घ काळ पीडित मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाणे येथे भारतीय न्‍याय संहिता २०२३ चे कलम ७५, ७६, ७८, ७९ तसेच बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्‍सो) कलम ८, १२ आणि १७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ज्‍योत्‍स्‍ना मासे करीत आहेत.