अजित पवार आणि शरद पवार यांच्यात उभी फूट पडली आहे. जून २०२३ मध्ये अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्यासह जे आमदार गेले आहेत, त्यांच्याबाबत आता आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचा दावा केला आहे.
काय म्हणाले आहेत रोहित पवार?
“लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे २२ आमदार परत शरद पवारांकडे येतील” असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत.
‘अजित पवारांना लोकसभेच्या फक्त चार जागा मिळतील’
“बंद खोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतील आमचं ऐकावं लागेल. अजित पवारांना लोकसभेच्या फक्त चार जागा मिळतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दहा जागा मिळतील. अमित शाहांचं त्यांना ऐकावंच लागेल. पण अजित पवारांची भूमिका त्यांच्या पक्षातील सगळ्याच नेत्यांना मान्य असेल असं नाही”, असं रोहित पवार म्हणाले.
हे पण वाचा- “मी ‘त्या’ लोकांना सोडून जाणार नाही”, आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला
“बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल हे जनताच ठरवेल. अमित शाह, नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतं. कारण त्यांना लोकांची भीती आहे. बारामतीची जनता ही पवारांच्या आणि विचारांच्या पाठिशी राहील. वेगवेगळे सर्वे असतात. मात्र महाविकास आघाडीला ३० जागा मिळतील. १८ ते २० जागा महायुतीला मिळतील”, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे.