पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ७० हजार कोटी रुपयांचा जलसिंचन घोटाळा केला, असा आरोप त्यांनी केला. यापूर्वी भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आम्ही सत्तेत आलो तर अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग करतील, असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर भाजपाकडून होणारा विरोध मावळल्याचं चित्र आहे.
यावरून ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी टीकास्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस आधी अजित पवारांना चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचे आणि आता अजित पवारांचं किसिंग किसिंग चालू आहे, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “पक्षात फूट पडली नाही, अजित पवार गटाने…”, रोहित पवारांचं मोठं विधान…
देवेंद्र फडणवीसांवरील केंद्राची कृपादृष्टी आता कमी झाली आहे. केंद्रही फडणवीसांना जवळ करत नाही, असं बोललं जातंय. ‘सामना’तूनही फडणवीसांना सांभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे, याबाबत विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले, “राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताखाली काम करावं लागतंय. ज्या व्यक्तीवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. बैलगाडीभर पुरावे घेऊन जायचं होतं. ते अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचे आणि आता अजित पवारांचं किसिंग किसिंग चालू आहे.”