शिरूर मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. यामुळे अजित पवारांनी थेट खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं आहे. अजित पवारांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच अमोल कोल्हेंनी ‘दिलेला शब्द खरा केला’ असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

अमोल कोल्हे ‘एक्स’ अकाउंटवर म्हणाले, “दिलेला शब्द खरा केला.! माननीय नितीन गडकरींचे आभार! आपल्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळालं! नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर, वाघोली ते शिरूर या तिन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राट निघाले आहेत. मायबाप जनतेला ही बातमी सांगताना मला अत्यंत समाधान वाटतंय!”

“अनेक वर्षांपासून प्रलंबित राष्ट्रीय महामार्गावरील हे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार झाल्यापासून मी अविरतपणे प्रयत्न करत होतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, अनेकदा बैठका घेतल्या, भेटी घेतल्या, पत्रव्यवहार केले. संसदेत सुद्धा हा मुद्दा उचलून धरला आणि आज या तिन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉरचे टेंडर निघाले आहेत. आता लवकरच प्रत्यक्षात काम सुरू होईल व मायबाप जनतेला रोजच्या वाहतूक कोंडीतून कायमचा दिलासा मिळेल!,” अशा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपल्या सर्वांच्या साथीने निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करू शकलो, त्याचं समाधान वाटत आहे. नितीन गडकरींकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर त्यांनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते व त्यांनी आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार मानतो! जय शिवराय!,” असं अमोल कोल्हेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.