नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांनी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने विजय संपादन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नागपूरमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नागपूरच्या स्थानिक राजकारणावरून समर्पक चारोळी शेअर करत भाजपाला खोचक टोला लगावला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आगामी काळात महाराष्ट्रात भाजपाची धुरा नितीन गडकरी सांभाळतील का? असा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे.

हेही वाचा- MLC Election : नागपूरमधील भाजपाच्या पराभवानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा पराभव…”

दरम्यान, त्यांनी भाजपाचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला आहे. मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “नागपूरकर ‘गाणार’… आज ‘कमळाबाई’ जाणार… बावन’कुळां’चा उद्धार… काही दिवसांत होणार… संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी… नितीनजी ठरतील का भावी “गड”करी?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमका निकाल काय लागला?

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. अडबोले यांनी ७ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादन केला. अडबोले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपाकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली. भाजपाने नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी भाजपा उमेदवार नागोराव गाणार त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या.