भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आज पुण्यात महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली. या दरम्यना सोमय्या हे पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापतही झाल्याचे समोर आले आहे. या घटनेवर आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच, फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा देखील दिला आहे.

VIDEO: पुण्यात राडा, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर

“राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!” असं देवेंद्र फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

भाजपा नेते किरीट सोमय्या शिवाजीनगर आज संजय राऊत यांचे भागीदार असलेल्या सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आले होते, त्यानंतर ते पुणे महापालिकेतही गेले होते. यावेळी त्यांना शिवसैनिकांकडून विरोध दर्शवत धक्काबुक्की केली गेली. यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.

संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा – किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

“संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले. या ठिकाणी अनेक करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, २० कोटींचं दुसरे करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.” असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “आज दुपारी ४ वाजता मी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. खोटे डॉक्युमेंट्स देवून कॉन्ट्रॅक्ट मिळविला. कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झाला पाहिजे.” अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे दिली होती.