अलिबाग : शेकापच्या जंयत पाटील यांनी सुनील तटकरे यांची २०१९ ला साथ दिली नसती तर, ते रायगडच्या आणि राज्याच्या राजकारणातून कायमचे हद्दपार झाले असते असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी केला. ते अलिबाग आगरसुरे येथील इंडीया आघाडीच्या जनसंवाद मेळाव्यात बोलत होते. मात्र शेकापने आता त्यांची चुक सुधारली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ पाठीशी आहे. त्यामुळे यावेळी तटकरेंची हद्दपारी अटळ असल्याचेही ते म्हणाले.
या मेळाव्याला शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील. माजी आमदार सुभाष पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, काँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रविण ठाकूर, काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रध्दा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे आदी नेते उपस्थित होते.
देशात पाच राज्यांच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. या निवडणूकीत देशभरात भाजप विरोधी वातावरण होते. पण काँग्रेसनी स्थानिक प्रादेशिक पक्षांना सोबत घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झाला. मात्र या पाच राज्यांच्या निवडणूकीत भाजपला ४१ टक्के मतं मिळाली. काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही ३९.५० टक्के होती. म्हणजेच दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीतील फरक हा दीड टक्क्यांचा होता. पराभवानंतर काँग्रेसनी आपली चूक सुधारली आहे. स्थानिक पक्षांना सोबत घेऊन इंडीया आघाडीची स्थापन झाली आहे. ५९ टक्के जी भाजप विरोधी मते आहेत ती आता एकत्र झाली आहेत. त्यामुळे भाजप ४०० पारचा नारा दिला असला तरी ते दोनशे पारही होणार नाहीत असा विश्वास गीते यांनी यावेळी व्यक्त केला.
शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. राज्यातील रायगड, मावळ, माढा, कोल्हापूर, लातूर यासह विदर्भातील काही मतदारसंघात शेकापची निर्णायक मते आहेत. पण तरीही आम्ही इंडिया आघाडीकडे एकही लोकसभेची जागा मागितली नाही.
हेही वाचा…सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
विधानसभेच्या जागा मागणार आहोत. यावेळी उमेदवारी मागितली नाही कारण शेकापने उमेदवार दिला असता तर भाजपचा फायदा झाला असता. राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा असल्याचे मत त्यांनी मांडले. इंडिया आघाडी लोकसभा पुरती मर्यादित न ठेवता ती विधानसभा आणि स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या निवडणूकीपर्यंत रहावी हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी तडजोड करायची आमची तयारी असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. सर्वांना प्रतिनिधीत्व देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तटकरेंना मदत करून आम्ही गेल्या निवडणूकीत चूक केली आता ही चूक आम्ही सुधारणार आहोत. मोदी आणि तटकरे यांना हटवण्यासाठी शेकापही काहीही करण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले.