रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. या मुद्द्यावरून टीका होऊ लागल्यानंतर चेक परत घेण्यात आल्याचं वृत्त खरं असल्याचं खुद्द पालकमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, दिलेले चेक परत घेण्याचं कारण वेगळं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी देखील याला दुजोरा दिला असून प्रसारमाध्यमातून प्रसारित केले जाणारे वृत्त सत्य परिस्थितीला धरून नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नेमकं घडलं काय?

हे चेक परत का घेण्यात आले? याविषयी माध्यम प्रतिनिधींनी खुद्द अनिल परब यांना विचारणा केली असता त्यांनी यावर खुलासा केला आहे. “मी स्वत: जाऊन पोसरे गावात शासनाच्या मदतीचे चेक देऊन आलो होतो. पण गावातील काही प्रतिनिधींनी विनंती केली होती की चेक दिलेली बँक ३० किलोमीटर लांब आहे. त्यामुळे तिथे जाण्याची आमची अडचण आहे. त्यामुळे आपण शासनाचा प्रतिनिधी आमच्यासोबत द्यावा. त्यांचे खाते नंबर शोधायचे होते. चिपळूणच्या सर्व बँका पुराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे शासनाच्या प्रतिनिधीने ते चेक परत घेतले होते. ते वटवण्याचं काम दुसऱ्या बँकेतून किंवा त्याच बँकांमधून केलं गेलं. शासनाचा प्रतिनिधीने स्वत: जाऊन सगळ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले आहेत”, असा खुलासा अनिल परब यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाभार्थ्यांच्या विनंतीवरून घेतला निर्णय

दरम्यान, या मुद्द्यावर स्थानिक जिल्हा प्रशासनाने देखील स्पष्टीकरण दिलं आहे. “चेक वाटपाबाबत चुकीची बातमी पसरली होती. खेडमधल्या पोसरेमधील चार मयतांच्या वारसांना चेकचं वाटप करण्यात आलं होतं. मात्र, दुर्घटनाग्रस्त लोकांची घरं गाडली गेल्यामुळे त्यांचे बँक खाते क्रमांक किंवा त्याचा तपशील वारसांकडे उपलब्ध नसल्यामुळे आणि त्यांची बँक ३० किलोमीटर लांब असल्यामुळे त्यांचे चेक घेऊन पैसे थेट बँकेत जमा करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या विनंतीनुसार मदत करण्यासाठी संबंधित तलाठ्यांनी चेक परत घेतले होते. सध्या सर्व चेक बँकेत जमा झाले आहेत”, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली.