Anjali Damania slams DGP on MCOCA Gotya Gitte : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारी विश्व चर्चेत आलं होतं. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींवर शेकडो गुन्ह्यांची नोंद आहे. अशी अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी बीडमधील गुन्हेगारांच्या अनेक टोळ्यांवर मकोकाअंतर्गत थेट कारवाई केली होती.
काही दिवसांपूर्वी परळीमधील सहदेव सातभाई यांच्या खुनाचा कट उधळून लावल्यानंतर बीड पोलिसांनी वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक असलेल्या गोट्या गित्ते याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई केली होती. गोट्या गित्ते हा कुप्रसिद्ध गुन्हेगार रघुनाथ फड याच्या टोळीमधील सदस्य आहे. पोलिसांनी फडच्या टोळीतील सात जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी आता या सातपैकी पाच जणांवरील मकोका रद्द करत त्यांना दिलासा दिला आहे. वाल्मिक कराडचा राइट हँड म्हणून ओळखला जाणाऱ्या गोट्या गित्तेचाही यात समावेश आहे. पोलिसांनी गोट्या गित्तेला दिलासा देत त्याच्यावरील मकोका रद्द केला आहे.
पाच अट्टल गुन्हेगारांवरील मकोका रद्द
बीड पोलिसांनी गोट्या गित्ते, संदीप सोनवणे, जगन्नाथ फड, बालाजी गित्ते व विलास गित्ते यांच्यावरील मकोका रद्द केला आहे. दरम्यान, बीड पोलिसांच्या या निर्णयावर राजकीय व सामाजिक स्तरावरून टीका होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पोलिसांच्या या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. अंजली दमानिया यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पोलिसांना मकोका रद्द करण्याचं कारण विचारलं आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मकोका रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याचा सल्ला दिला आहे.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
“बीडमधील वाल्मिक कराडच्या आणि आणखी एका गँगचा सदस्य गोट्या गित्तेवर १६ गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर लागलेला मकोका हा पोलीस महासंचालकांनी रद्द का केला केला? उद्या या माणसाने आणखी खून केले तर त्याची जबाबदारी महासंचालक मॅडम घेणार का?”
“पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक हे मकोकाचा प्रस्ताव उगाच पाठवतात का? ही पाच नावे का वगळण्यात आली याचे उत्तर पोलीस महासंचालक कार्यालयाने तत्काळ दिले पाहिजे. ताबडतोब फेरविचार करून पोलीस महासंचालक कार्यालयाने हा निर्णय मागे घ्यावा. आम्ही जीवाची पर्वा न करता या गुन्हेगारांविरोधात लढा दिला आणि हे पोलीस महासंचालक कार्यालय बेजबाबदारपणे मकोका रद्द कसं करू शकतं?”
यासह दमानिया यांनी गोट्या गित्तेविरोधात दाखल असलेल्या १६ गुन्ह्यांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. त्याच्याविरोधात बीड, लातूर, परभणी व पुण्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.