नगर रस्त्यावरील खराडी हा भाग एके काळी ग्रामीण भाग म्हणून ओळखला जायचा. गेल्या काही वर्षांत खराडी बाह्य़वळण मार्गावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कं पन्या सुरू झाल्या आणि या भागाचा चेहरामोहरा बदलून गेला. या भागातील सिनेक्रॉन कंपनीत नयना पुजारी संगणक अभियंता म्हणून काम करत होत्या. त्या ८ ऑक्टोबर २००९ रोजी रात्री आठच्या सुमारास कंपनीतून घरी निघाल्या होत्या. कात्रज भागातील दत्तनगर परिसरात त्या राहायला होत्या. हडपसरहून पीएमपी बसने घरी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खराडी बाह्य़वळण मार्गावरील पीएमपी थांब्यावर त्या थांबल्या होत्या. त्या वेळी एक मोटार आली. मोटारचालक आणि त्याच्या साथीदारांनी पुजारी यांना हडपसर येथे सोडण्याचा बहाणा केला. घरी लवकर पोहोचायचे असल्याने नयना यांनी होकार दिला. त्यानंतर मोटारचालक आणि त्याच्या साथीदारांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. नयना यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह खेड तालुक्यातील जरेवाडी फाटा भागात सापडला.
संगणक अभियंता महिलेचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे शहरात खळबळ उडाली होती. पोलीस देखील हादरून गेले होते. कारण पुणे शहरातील आयटी क्षेत्राचा लौकिक देशपातळीवर आहे. अशा प्रकाराच्या घटना या शहराला काळिमा फासणाऱ्या असतात. त्यामुळेच संगणक अभियंता महिलेच्या खूनप्रकरणाची चर्चा देशभरात झाली. नयना अभिजित पुजारी (वय २८, रा. अशोका आगम सोसायटी, दत्तनगर, कात्रज) या विवाहित होत्या. त्यांचे पती अभिजित हे उच्चशिक्षित आहेत. नयना सिनेक्रॉन कंपनीत होत्या. खराडी ते कात्रज हे अंतर साधारणपणे अठरा ते वीस किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे संध्याकाळी काम संपल्यानंतर घरी पोहोचेपर्यंत नयना यांना उशीर व्हायचा. या भागात अनेक आयटी कंपन्या आहेत. या भागातील कॅबचालक रिकामी मोटार नेण्यापेक्षा प्रवासी वाहतूक करतात. आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी कॅबचा वापर केला जातो. रात्री आठच्या सुमारास नयना खराडी बाह्य़वळण मार्गावर रिलायन्स मार्टनजीक असलेल्या बस थांब्यावर थांबल्या. त्या वेळी आरोपी योगेश अशोक राऊत (वय २४), महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड, जि. पुणे), विश्वास हिंदूराव कदम (वय २६, रा. दिघी, आळंदी रस्ता, मूळ रा. भुरकवाडी, ता. खटाव, जि. सातारा) हे मोटारीतून खराडी बाह्य़वळण मार्गावर आले.
बसथांब्यावर एकटय़ा थांबलेल्या नयना यांना आरोपींनी पाहिले. आरोपींनी नयना यांना हडपसपर्यंत सोडतो, अशी बतावणी केली. नयना यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर आरोपींनी मोटार मांजरी आव्हाळवाडी भागातून नेली. अंधार असल्याने नयना यांना रस्ता समजला नाही. मात्र, त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी आरोपींकडे विचारणा केली. आरोपींनी धावत्या मोटारीत त्यांना मारहाण केली. मोटारीच्या काचा लावण्यात आल्या होत्या. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने नयना यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला नाही. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास आरोपींनी मोटार नगर रस्त्यावरील वाघोली भागातील शंकर पार्वती मंगल कार्यालयानजीक असलेल्या पटांगणात नेली. तेथे त्यांनी नयना यांना मारहाण केली. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, आरोपींनी त्यांचा साथीदार राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, रा. गोलेगाव, ता. खेड, जि. पुणे) याच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्याला तेथे बोलावून घेतले. चौधरी यानेही नयना यांच्यावर अत्याचार केले. आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यांच्या पर्समधील एटीएम कार्ड काढून घेतले. एटीएमचा सांकेतिक क्रमांक आरोपींनी लिहून घेतला. आरोपी राऊत, ठाकूर हे चौधरी याची दुचाकी घेऊन विमाननगर भागात गेले. तेथील एका एटीएम सेंटरमधून नयना यांच्या खात्यातील सोळा हजार रुपये त्यांनी काढून घेतले. राऊत, ठाकूर तेथे परतले. त्यानंतर फुलगाव फाटा ते तुळापूर रस्त्यावर मोटार थांबवून चौघा आरोपींनी पुन्हा नयना यांच्यावर अत्याचार केले. त्या वेळी चार जणांनी हा प्रकार पाहिला होता. तेव्हा आरोपींनी मोटारीत असलेली महिला वेश्या असल्याची बतावणी त्या चार जणांकडे केली होती. त्या चार जणांना या खटल्यात साक्षीदार म्हणून उभे करण्यात आले.
हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून आरोपींनी नयना यांचा खून करण्याचे ठरवले. खेड तालुक्यातील जरेवाडी फाटा भागात अंधारात नयना यांचा गळा ओढणीने आवळून त्यांनी त्यांचा खून केला. ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर मोठा दगड घातला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डय़ात मृतदेह टाकून आरोपी पसार झाले. आरोपींनी नयना यांची पर्स नदीपात्रात फेकून दिली. सोन्याच्या बांगडय़ा, मनगटी घडय़ाळ, मोबाइल काढून घेतला. खून करून पसार झालेल्या आरोपींनी नयनाच्या एटीएम कार्डचा वापर करून कल्याणीनगर आणि खडकी बाजार येथील एटीएम केंद्रातून ४५ हजार रुपये काढले. दरम्यान, नयना रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने पती अभिजित यांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार येरवडा पोलीस ठाण्यात दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांनी तातडीने तपास सुरू केला. ९ ऑक्टोबर रोजी जरेवाडी फाटा येथे महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती खेड पोलिसांकडून देण्यात आली. येरवडा पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. अभिजित यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
असा काढला आरोपींचा माग
गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार हे तांत्रिक तपासात निष्णात मानले जातात. येरवडा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी तपास करून आरोपींचा माग काढला. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून करण्यात आलेले चित्रीक रण पडताळून आणि तांत्रिक तपास करून चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. नयनाचा खून झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली असताना पोलीस निरीक्षक पवार यांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा माग काढला. खराडी बाह्य़वळण मार्ग ते नयना यांचा ज्या ठिकाणी खून झाला, त्या भागापर्यंत प्रत्येक संशयित मोबाइलधारकांची तपासणी करण्यात आली होती. त्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले.