MIM Rally, अहिल्यानगर : जातीयवाद हा भाजपचा ‘अजेंडा’च आहे. त्यावर ते आपली राजकीय पोळी भाजतात. या देशात ९८ ते ९९ टक्के जनता कोणत्या ना कोणत्या धर्माला मानते. मुस्लिम समाजात हजरत मोहम्मद पैगंबर यांना सर्वोच्च स्थान आहे. ‘आय लव्ह मोहम्मद’च्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यात गैर काय?

संविधानात काय तरतुदी आहेत, कुणी काय बोलायचे, कुणावर प्रेम करायचे हे भाजप ठरवणार का? प्रेमाबद्दल त्यांना एवढा तिरस्कार का? अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली. नगर शहरात मुस्लिम समाजाविरुद्ध भावना भडकवणारी विधाने केली जात आहेत, त्यामागे सरकार असल्याचाही आरोप त्यांनी केला.

नगर शहरातील मुकुंदनगर भागात खासदार ओवेसी यांची सभा आज, गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या सभेस उपस्थित राहाण्यासाठी खासदार ओवेसी नगरमध्ये आले होते. सभेपूर्वी त्यांनी सरकारी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. खासदार ओवेसी यांची यापूर्वीची सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली होती.

नगर शहरातील रांगोळी प्रकरण व त्यानंतर झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यासंदर्भात बोलताना खासदार ओवेसी यांनी शहरात शांतता आवश्यक आहे. परंतु, कोणी काय लिहायचे व बोलायचे, हे भाजप ठरवणार का, असा प्रश्न उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीनंतर बदललेले राजकारण, अहिल्यानगर शहर मुस्लिम समाजाविरोधात होणारी विधाने यावर बोलताना खासदार ओवेसी म्हणाले, जे लोक हे करत आहेत ते सरकारच्या पाठिंब्यामुळेच. ज्यांनी अशी विधाने केली, शिव्या दिल्या, त्यांना मंत्री केले गेले, हे सरकारचे अपयशच आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याकडे लक्ष वेधत हा दलित समाज व न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. ही विकृत मानसिकता असल्याचेही त्यांनी म्हटले. हे कृत्य करणारा कोणी तरुण नव्हता तर ७० वर्षांचा वृद्ध होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यातील पूरस्थिती व अतिवृष्टीमुळे बाधितांना राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले. मात्र, याऐवजी कर्जमाफीच व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

लडाखमधील नागरिकांच्या मागण्या योग्य आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत सरकार चुकीच्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे. ज्यांनी पूर्वी ३७० कलम रद्द झाल्याबद्दल पाठिंबा दिला, त्यांनाच सरकार आज अटक करत आहे. मात्र, त्याऐवजी सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करायला हव्यात, सोनम वांगचुक हे तर मॅगसेस पारितोषिक विजेते आहेत, असेही खासदार ओवेसी म्हणाले.