सांगली : भागवत धर्मातील साधू-संतांच्या वेषातील बच्चे कंपनी, टाळ-मृदंगांचा ध्वनी आणि मुखी जय हरी विठ्ठल, ज्ञानबा तुकाराम यांचा जयघोष अशा भक्तिपूर्ण वातावरणात रविवारी सांगली, मिरज शहरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.

आज साप्ताहिक सुटी असूनही मिरजेत शिवतीर्थ आणि लक्ष्मी मार्केट परिसरात लहान मुलांचा वारकरी वेषातील दिंडी सोहळा चांगलाच रंगला. शहरातील विविध शाळांतील मुलांसह लक्ष्मी मार्केट परिसरात दिंड्या एकत्र जमा झाल्या. मुख्य दिंडी मैदान दत्त मंदिर येथून काढण्यात आली. पालखीसह निघालेल्या दिंडीमध्ये शाळेतील लहान मुले, वारकरी, भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मार्केट परिसरात आल्यानंतर रिंगण सोहळाही साजरा करण्यात आला. यानंतर ब्राह्मणपुरीमध्ये असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी मुलांना खाऊ वाटप, फराळ वाटपही करण्यात आले. दिंडीत मुलांनी साधू-संतांचे वेष परिधान केले होते.

दिंडी सोहळ्यात मिरज शहरातील विविध शाळांतील सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच आमदार सुरेश खाडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी स्थायी सभापती पांडुरंग कोरे, सुरेश आवटी, सुशांत खाडे आदींसह अनेक माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर मंगळवार पेठेतील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गुरुकुल शिक्षण संस्थेच्यावतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सुरुवात बसवेश्वर पुतळ्यापासून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ याची सांगता करण्यात आली. यामध्ये प्रा. मोहन वनखंडे, अनिता वनखंडे, संतोष जाधव, सविता पाटील, स्वप्नाली मेंढे, कविता अमृता शिंदे, सुजाता कदम आदी सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सांगली, मिरज शहरातील विविध विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आज सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. अनेक मंदिरात एकादशीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.