Ashok Chavan महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी प्रचाराच्या दरम्यान बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है असं म्हटलं होतं. मात्र या घोषणांवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही दोन मतप्रवाह आहेत असं दिसून येतं आहे. भाजपाचे खासदार अशोक चव्हाण ( Ashok Chavan ), भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिन्न भूमिका मांडल्या आहेत.

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?

मी माझ्या कामावर विश्वास ठेवतो. मी सेक्युलर आहे. मी भाजपात असलो तरीही मी सेक्युलर हिंदू आहे. मी मला हिंदुत्वावपासून वेगळं केलेलं नाही. पण मी सेक्युलर हिंदू आहे. संविधानही हेच सांगतं. भाजपामध्ये ही विचारधारा आहे की आम्ही हिंदू आहोत पण तरीही भाजपात सेक्युलर असूनही हिंदुत्व मानणारेही लोक आहेत असं अशोक चव्हाण यांनी ( Ashok Chavan ) म्हटलं आहे.

मला अकारण बदनाम करण्यात आलं-अशोक चव्हाण

आदर्श घोटाळा वगैरे काही नाही. काँग्रेस पक्षातल्या लोकांनीच मला बदनाम केलं. मला अनेक गोष्टी असह्य झाल्या. मी पक्षात होतो त्यावेळी मी कामं केली आहेत. मात्र माझ्या कामांची काही किंमतच केली गेली नाही. पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अपेक्षा असतात. मात्र त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे मी पक्ष सोडला. भाजपा हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. मोदी देशाचं नेतृत्व करत आहेत. मला बदल करावासा वाटला त्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडला असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) हे म्हणत आहेत तर पंकजा मुंडेंचाही असाच काहीसा सूर आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“बटेंगे तो कटेंगे या घोषणांची आवश्यकता नाही. विकासाचे मुद्दे मांडले पाहिजे. महाराष्ट्रात अशा घोषणा नकोत. मी भाजपात आहे म्हणून या घोषणेचं समर्थन करणार नाही. योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या संदर्भात घोषणा दिली होती. या घोषणेचे अर्थ मोदींनी जात धर्म न पाहता सर्वांना न्याय दिला यासंदर्भातली ती घोषणा आहे. योगायोगाने मोदींनी एक है तो सेफ है ही घोषणाही दिली होती. त्याच घोषणेचा हा वेगळ्या पद्धतीने केलेला उल्लेख आहे.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका मांडली. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अशीच भूमिका मांडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार काय म्हणाले?

महाराष्ट्र हा शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इतर राज्यांची तुलना महाराष्ट्राशी होऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने कायमच जातीय सलोखा ठेवला आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येतात आणि त्यांचा विचार करुन बोलतात. मात्र महाराष्ट्राने हे मान्य केलेलं नाही. अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) हे भाजपाचे खासदार आहेत तर पंकजा मुंडे भाजपाच्या नेत्या. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत पण ते महायुतीत सहभागी झाले आहेत. बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरुन भाजपातच दोन मतप्रवाह आहेत अशी स्थिती या वक्तव्यांमुळे दिसून येते आहे.