अलिबाग : पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आश्रमशाळेतील तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षक महादेव जानू वारगुडे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. वेतन मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे हे पाऊल उचलल्याचे त्याने समाजमाध्यमांवर टाकलेल्या पोस्टमधून समोर आले आहे.आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या घरातील संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच होती. एक भाऊ मतिमंद आहे. लहान मुले आणि तरुण पत्नी तसेच भाऊ आणि कुटुंबाची जबाबदारी पेलताना अशक्य झाल्याने त्यांनी शेवटी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सातारा:महाबळेश्वर येथे दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत जनरेटरचा स्फोट; दहा मुले भाजली

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य व केंद्र सरकारला दोष दिला आहे. तासिका कर्मचाऱ्यांना लवकर कायम करा अन्यथा पगारात वाढ करा. नायतर माझ्यासारखी प्रत्येकावर वेळ यायला वेळ लागणार नाही. माझी सोन्यासारखी मुलं सोडून जाताना काय वेदना होतात हे सरकारला आता तरी कळणार आहे की नाही असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. अजून खूप जगावंसं वाटत होतं पण वेळेवर पगार नाही कसं जगावं हेच कळत नाही, असंही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेबददल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा रायगड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आदिवासी कुटुंबातील तरुण शिक्षकावर अशी वेळ यावी ही घटना निषेधार्ह असून चीड आणणारी आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा रायगड तसेच राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, ग्रामपंचायत, कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती, रायगडतर्फे सरकारचा निषेध करण्यात आला आहे.  दरम्यान या संदर्भात आदिवासी विकास विभागाच्या पेण येथील कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या महिन्यात वारगुडे यांनी २० दिवस काम केले आहे. त्याचे मानधन महिना संपल्यानंतर मिळणार आहे. याव्यतिरिक्त त्याचे कुठलेही मानधन आमच्या कार्यालयाकडे थकीत नाही. यापूर्वी दोन वर्षे त्यांनी नियमित काम केले. मात्र या वर्षांत ते अनियमित होते असेही अहिरराव यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashram school teacher committed suicide by consuming poison in pen taluka zws
First published on: 25-10-2023 at 02:23 IST