वंचित बहुजन आघाडीकडून आज (१ मे) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या परिसरातून काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीला पोलीस विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर देवमन बकले यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त क्रांती चौक, पैठण गेट, औरंगपुरा भागातील महात्मा फुले पुतळा परिसर ते भडकल गेटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शांतता रॅली काढण्यासाठी अर्ज केला होता. तर पोलीस विभागाकडून या रॅलीला सकाळी ७ ते ९ या वेळेत परवानगी देण्याची तयारी दर्शवली होती.

मात्र, त्या संदर्भात वंचितकडून १ मे रोजी सकाळी ११ पर्यंत कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यातून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका नाही, असे स्पष्ट करत तसेच सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा असल्याने व पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बंदोबस्तात व्यस्त असल्याने, वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीसाठी परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, राज ठाकरे यांच्या सभेस परवानगी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. शहराध्यक्ष अहमद जलीस यांनी तसे पत्र पोलीस आयुक्तांकडे दिले होते. भोंगे काढा अन्यथा मशिदीसमोर हुनमान चालिसा म्हटली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे. यामुळे शांतता भंग होईल असे वातावरण निर्माण झाले असून मुस्लिमांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे शांताता व सुव्यवस्था राखण्यासाठी सभेला परवानगी नाकारावी अशी विनंती करण्यात आली होती.