Balasaheb Thorat : परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज बीड आणि परभणीचा दौरा केला. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. तसंच यावेळी बाळासाहेब थोरातही त्यांच्या बरोबर होते. बाळासाहेब थोरात यांनी सूर्यवंशी प्रकरणावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

सरकारची मानसिकता पाहिल्यानंतर काय अपेक्षा करणार? सर्वोच्च सभागृहात ज्या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला जातो आहे त्याचा अर्थ पुरोगामी विचारांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी ही दुर्दैवी आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची घटना ही सरकारची मानसिकता दाखवणारी आहे. १० लाखांनी बलिदानाचा विषय संपतो का? सरकारची मानसिकता जाती धर्माचं विष पसरवणारी आहे. १० लाखांची मदत देऊन हा विषय संपत नाही. असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तसंच विरोधी पक्षनेते जर येत असतील तर त्याला नौटंकी म्हणणं हे चुकीचं आहे. समाजाकडे ते याच दृष्टीने पाहतात हेच यातून दिसतं असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राहुल गांधींनी हे म्हटलंय की हत्या आहे कारण हे प्रकरण तसंच आहे. काही व्हिडीओ समोर आले आहेत. राहुल गांधींनी हा मुद्दा समोर आणला आहे. अधिवेशनात आम्ही हा मुद्दा समोर आणला. पूर्ण चौकशी झाली की नाही हे वाटत असतानाच सरकारने निर्णय दिला आहे. सूर्यवंशी यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आमचं जन आंदोलन सुरु आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

सोमनाथ सूर्यवंशी कोण होता? सुषमा अंधारेंचा आरोप काय?

सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता, तो लॉ अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसत होत्या. तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला. तो न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याचा मृत्यू पोलीस कोठडीतील अमानुष मारहाणीमुळे झाला, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुषमा अंधारेंनी दाखवला होता फोटो

सुषमा अंधारे यांनी मृत सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा असलेला फोटो सगळ्यांना दाखवला. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत संशय व्यक्त केला. विजय वाकोडे हा जुना पँथरचा माणूस आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारीरिक व्याधीमुळे विजय वाकोडे जागेवरुन हलू शकत नाहीत. हा माणूस रस्त्यावर येऊन तोडफोड करु शकत नाही. तर रवी सोनकांबळे हा माजी नगरसेवक होता. हा अत्यंत समंजस व्यक्ती आहे. रवी सोनकांबळे याने अनेक वर्षे परभणीतील शांतता कमिटीत काम केले आहे. पोलिसांनी एकाच कुटुंबातील सगळ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत असंही अंधारेंनी म्हटलं होतं.