सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील बांदा चेक पोस्टजवळ बांदा पोलिसांनी होंडा (गोवा) येथून सांगलीच्या दिशेने टेम्पोमधून केल्या जाणाऱ्या गुरांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४७ जनावरांची सुटका करण्यात आली असून, ११ जणांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तीन आयशर टेम्पो आणि एक पिकअप टेम्पोसह एकूण ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर करण्यात आली.
बांदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्सुली तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांना गोव्यातून सांगली येथे गुरांची वाहतूक करणारे टेम्पो आढळले. चालकांनी ही गुरे कवठेमहांकाळ (सांगली) येथील गोशाळेत नेण्यात येत असल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने गोरक्षक बांदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.पोलिसांनी केलेल्या तपासणीत जनावरांना दाटीवाटीने टेम्पोत कोंबण्यात आले होते आणि त्यांच्यासाठी गवत किंवा पाण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. ही बाब प्राण्यांच्या छळाचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईवेळी बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. जनावरांची अमानुषपणे वाहतूक करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सुनील ज्ञानेश्वर पाटील (बेळगाव), अमोद फुशन शर्मा (बिहार), किरण भांगरे (फोंडा गोवा), बाबू इलाही जामदार (शिरोळ कोल्हापूर), सतीश बाबुराव पुजारी (शिरोळ कोल्हापूर), नामदेव पंढरीनाथ पाटील (कवठेमहाकाळ सांगली), सुलोचना महेश गिरोडकर (गोवा), पोपट जयवंतराव पाटील (कवठेमहाकाळ सांगली), प्रदीप हैबती सव्वासे (कोल्हापूर), सुरत शौकत लकडे (कोल्हापूर) आणि श्याम रामराव कुलकर्णी (सांगली) या ११ जणांचा समावेश आहे. या सर्व ४७ जनावरांना त्यांच्या मूळ ठिकाणी, होंडा गोवा येथे सोडण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.