परभणी : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी शहरातील शासकीय अध्यापक विद्यालय परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल बंजारा समाजाने प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चाला बंजारा समाजातील युवक, महिला अशा सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या पारंपरिक वेशात लोक सहभागी झाले होते.

जिंतूर रस्त्यावरील शासकीय अध्यापक महाविद्यालय परिसरातून महाराणा प्रताप चौक-जांब नाका-जिल्हा सामान्य रुग्णालय-शिवाजी चौक-गांधी पार्क-नारायण चाळमार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आल्यानंतर या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली.

बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी वारंवार करूनही या प्रश्नावर सरकार लक्ष देत नाही. या मागणीसाठी समाजाची सातत्याने आंदोलने चालू आहेत. जोवर मागणी पूर्ण होत नाही तोवर बंजारा समाज कायम संघर्ष करत राहील, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील बंजारा व तत्सम जमातींना मध्य प्रांत नागपूर तसेच हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमातीच्या योजना आणि सवलती लागू केल्याची अधिसूचना वर्ष २००० च्या कायद्याच्या सुधारणेसह संविधानातील अनुच्छेद १६ चा वापर करून आदेश निर्गमित करावे, तसेच वसंतराव नाईक व तत्कालीन न्यायमूर्ती बापट व अन्य आयोगांच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या मोर्चात जिल्हाभरातून बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.