पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यत पूर येऊन गेला. मात्र बीड जिल्ह्यची स्थिती अतिशय गंभीर होऊ लागली असून भीषण दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाळ्याच्या अडीच महिन्यांमध्ये केवळ २४ दिवस पावसाने हजेरी लावली आहे. वार्षकि सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २४ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा परिस्थिती बिकट असून त्याचा परिणाम सार्वजनिक व्यवस्थेवर होऊ लागला आहे.

बीड जिल्ह्यत सातत्याने दुष्काळी स्थिती राहिलेली आहे. गेल्या वर्षी भीषण दुष्काळातून सावरलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र, पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. ६४ महसूल मंडळांपकी अजूनही आठ मंडळांत शंभर मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत खरिपाची पिके तग धरणे शक्यच नाही. कापूस, ज्वारी, मका, मूग, उडीद या पिकांनी माना टाकल्या आहेत. सोयाबीनचे पीक करपून चालले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. सध्या पावसाळा असूनही सहाशेपेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अडीच महिन्यांमध्ये केवळ २४ दिवस पाऊस झाल्याने एकाही प्रकल्पात किंवा नदी नाल्याला पाणी आले नाही. ग्रामीण भागासह शहरातील पाणीपुरवठा अवलंबून असलेले प्रकल्प आणि विहिरी कोरडय़ा पडलेल्या आहेत. गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र केवळ २४ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळाचे सावट पसरल्याने त्याचा परिणाम सार्वजनिक व्यवस्थेवर होऊ लागला आहे. बाजारपेठेमध्ये आतापासूनच शुकशुकाट जाणवत असून उद्योग क्षेत्रातही मंदी आली आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळी दुष्टचक्रातून जिल्ह्याची अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही. तोच पुन्हा एकदा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. खरिपातील पिके पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडले आहे.

आता परतीच्या पावसाकडे लक्ष

बीड जिल्ह्यात आतापर्यंत वार्षकि सरासरीच्या तुलनेत केवळ २४ टक्के पाऊस झाला आहे. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. कृत्रिम पाऊस पडेल या अपेक्षेवर असलेल्या जिल्हावासीयांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. अजून तरी हा प्रयोग जिल्ह्यत झालेला नाही. त्यामुळे आता परतीच्या पावसाकडेच सर्वाचे लक्ष आहे.